Chandrashekhar Bawankule : शिंदे की ठाकरे, काँग्रेसचे सरकार कोणाला आणायचे होते?, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले… | पुढारी

Chandrashekhar Bawankule : शिंदे की ठाकरे, काँग्रेसचे सरकार कोणाला आणायचे होते?, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : “एकनाथ शिंदे आमच्याकडे काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते.” हे अशोक चव्हाण यांचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे आहे. एकनाथ शिंदे ऐवजी उद्धव ठाकरे आमच्याकडे काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते, असे अशोक चव्हाण यांनी म्हणायला पाहिजे होते. पण ते नेमके उलटे बोलले. कारण तेव्हा शिवसेना एकनाथ शिंदे नव्हे तर उद्धव ठाकरे चालवित होते. त्यामुळे एकनाथ शिंदेचे नाव घेऊन अशोक चव्हाण संभ्रम निर्माण करीत आहेत. असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी बोलताना केला.

ॲार्गनायझेशन फॅार राईट्स ॲाफ ह्युमन ॲाफ (ॲाफ्रोह) महाराष्ट्र या संघटनेने संविधान चौकात उपोषण सुरू केले आहे. बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस आहे. जात प्रमामणपत्र पडताळणी समितीच्या विरोधात बेमुदत उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपोषण मंडपाला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये सहभागी होण्यास निघाले होते असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. ते नॅरेटीव्ह सेट करीत आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासु होण्याकरीता चंद्रकांत खैरे आश्चर्यकारकरित्या सक्रिय झाले आहे. कोणी पक्षात नसताना असे आरोप करणे म्हणजे जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. पक्ष प्रमुखांचे समर्थन असल्याशिवाय काहीच होत नाही. २०१४ वा २०१९ मध्ये भाजप विरोधात झालेले कारस्थान उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाशिवाय झाले नाही. उद्धव ठाकरे यांनीच हे कारस्थान रचले असेल म्हणून सध्या जे झाले ते घडले.

मागील सरकारच्या काळात मुंबईत हे आंदोलन चालले. आताही २९ जिल्ह्यांत आंदोलन सुरू आहे. तातडीने शासनाने बैठक लावून प्रश्न सोडवावेत अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे. जात पडताळणी समितीकडून होणाऱ्या अन्यायावर तोडगा काढू आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवू असे बावनकुळे यांनी सांगितले. अनुसूचित जमातीच्या ३३ जातींना जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, नोकरीवर आहे त्यांना व्हॅलिडीटी देण्यात यावे, सरकारी कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती बंद करावी, निवृत्तीनंतरचे लाभ मिळावे आदी मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे.

Back to top button