मुंबई : ठाकरे - शिंदे गटांमध्ये धारावीत राडा | पुढारी

मुंबई : ठाकरे - शिंदे गटांमध्ये धारावीत राडा

धारावी; पुढारी वृत्तसेवा :  एका माजी शिवसेना शाखाप्रमुखाचा शिंदे गटात सामील होण्याच्या कार्यक्रमात शिवसैनिक आणि
शिंदे गट हॉलबाहेर समोरासमोर भिडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी शिंदे गटाकडून शिवसैनिकांविरोधात धारावी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

धारावी मेन रोडवरील अशोक मील लगत असलेल्या मॉर्निग स्टार शाळेच्या हॉलमध्ये दादरचे आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली धारावीतील माजी शाखाप्रमुख रवी कोडम यांचा शिंदे गटात सामील होण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
याआधी शिंदे गटात सहभागी झालेले धारावीतील तीन ते चार कार्यकर्ते हॉलमध्ये गर्दी जमवण्यासाठी धावपळ करत असल्याची माहिती धारावीतील शाखाप्रमुखांना मिळाली.

घटनेची माहिती मिळताच शिवसेना धारावी विधानसभा समन्वयक राजेंद्र सूर्यवंशी, उपविभागप्रमुख प्रकाश आचरेकर, महादेव शिंदे, शाखाप्रमुख किरण काळे, आनंद भोसले, सतीश कटके, बाबा सोनावणे, मुत्तू पट्टन, भास्कर पिल्ले, सुरेश जाधव यांनी तात्काळ
शेकडो शिवसैनिकांसह युवासैनिक घटनास्थळी धाव घेतली. कार्यक्रम आटोपून शिंदे गटाचे कार्यकर्ते हॉलमधून बाहेर पडताच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख आणि शिंदे गटात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक
चकमक उडाली. धारावी पोलिसांनी मध्यस्थी करताच शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून शिंदे गटातील कार्यकर्त्यांची पाचावर धारण बसली.

शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, वातावरण चांगलेच तापल्याचे पाहून धारावी पोलिसांनी आमदार सरवणकर यांना दुसर्‍या मार्गाने जाण्यास सांगितले. नंतर शिंदे गटाच्या विभागप्रमुखांनी धारावी पोलीस ठाणे गाठून उपस्थित शिवसैनिकांविरोधात धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली.

Back to top button