मुंबई : पूर्व उपनगरांत पाण्याचा ठणठणाट; जलवाहिनी फुटल्याने तीन दिवस पाणीबाणी | पुढारी

मुंबई : पूर्व उपनगरांत पाण्याचा ठणठणाट; जलवाहिनी फुटल्याने तीन दिवस पाणीबाणी

भांडुप; पुढारी वार्ताहर :  भांडुपच्या महाराष्ट ? नगर क्वारी रोड येथे 900 एमएम व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या पूर्व उपनगरांत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भांडुपच्या काही
परिसरांतील रहिवाशांना हाल झाले आहेत. भांडुपच्या महाराष्ट्र नगर येथील जलवाहिनी तीन दिवसांपूर्वी फुटली होती. मात्र ती दुरुस्त होत असताना गुरुवारी आणखी एका ठिकाणी फु टली. याचा फटका घाटकोपरच्या श्रेयस सिग्नलचा परिसर, लोअर डेपो, विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी सूर्य नगर, टागोर नगर, कांजूर मार्ग, भांडुपचे मुकुंद नगर, टेम्बीपाडा, खिंडीपाडा भागांना बसला.

या जलवाहिनी मधून मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरांतील डोंगराळ झोपडपट्टीत पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र ज्या परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडित आहे, अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासही पालिकेला अडचणी येत होत्या. टँकरची मागणी
वाढल्याने टँकर पुरवठा कमी पडत होता. तर डोंगराळ भागात अरुंद रस्त्यांमुळे टँकर घेऊन जाणे अशक्य होते. त्यामुळे या डोंगराळ भागातील नागरिकांना पायपिट करीत पाणी खाली येऊन घेऊन डोंगर चढून जावे लागत होते. काही ठिकाणी इतर जलवाहिन्याचा प्रवाह
फिरवण्यात आला होता. मात्र ते अतिशय तुटपुंजे ठरले. यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. तीन दिवसांनी गुरुवारी पाणी येईल असे वाटत
असताना पुन्हा जलवाहिनी फुटल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच शुक्रवारी देखील या दुरुस्तीचे काम सुरू राहील आणि पाऊस असल्यास हे काम आणखी वाढेल, अशी शक्यता असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

पालिकेच्या नियंत्रण कक्षातून माहिती घेतली असता, शुक्रवारपर्यंत काम पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र स्थानिक
अधिकार्‍यांच्या मते हे काम आणखी लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका एन आणि एस विभागाला मोठा फटका बसणार आहे.
या जलवाहिनीबाबत तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांनी मोर्चा काढला.

याबाबत पालिका एस विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणाले की, याचा मोठा फटका आमच्या विभागाला बसला आहे. आम्ही तरी देखील मोठ्या प्रमाणात मोफत टँकरची व्यवस्था झोपडपट्ट्यांमध्ये करून देत आहोत. मात्र डोंगराळ भागात पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.तरी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. ही जलवाहिनी 900 वरून 1200 एमएम करावी याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. संबंधित अधिकार्‍यांची लवकरच बैठक होणार आहे, असे ते म्हणाले.

  • गेल्या दोन महिन्यांत तब्बल सातवेळा ही जलवाहिनी फुटल्याचे नागरिक सांगत आहेत. या पाणीबाणीवर ठोस उपाययोजना
    करण्याची मागणी संतप्त नागरिकांमधून जोर धरत आहे.
  • जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम लांबल्याने भाजपच्या स्थानिक पदाधिकारीर्‍यांनी पालिका एस विभाग कार्यालयावर मोर्चा काढून ही समस्या कायमची सोडवण्याची मागणी केली

Back to top button