

मुंबई : गेल्या पाच दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने सुमारे 33 कोटींचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला असून याच गुन्ह्यांत अकरा प्रवाशांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना किल्ला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बँकॉकहून हायड्रोपोनिक गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने अशा तस्करांविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरू असतानाच गेल्या पाच दिवसांत (10 डिसेंबर ते 15 डिसेंबर) या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या कारवाईत अकरा प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून तपासणीदरम्यान त्यात या अधिकाऱ्यांनी 33 किलो 400 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 33 कोटी 40 लाख रुपये इतकी आहे.
याच गुन्ह्यांत नंतर अकरा प्रवाशांना या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. अटक केलेले सर्व प्रवासी वेगवेगळ्या एअरलाईन्स विमानांनी बँकॉकहून हायड्रोपोनिक गांजा घेऊन आले होते. त्यासाठी त्यांना विमानाच्या तिकिटांसह ठरावीक रकमेच्या कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हे दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
लोअर परळ आणि वांद्रे परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या चार जणांच्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी आणि घाटकोपर युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यात एका विदेशी नागरिकाचा समावेश असून अटकेनंतर या सर्वांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी 226 ग्रॅम वजनाचे कोकेन, 248 ग्रॅम वजनाचे एक्स्टॅसीच्या (एमडीएमए) गोळ्या आणि 6 किलो 544 ग्रॅम वजनाचे हायड्रो गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत 9 कोटी 31 लाख रुपये इतकी आहे.
तपासात आरोपी नायजेरियन नागरिक असून तो टुरिस्ट व्हिसावर भारतात आला होता. व्हिसा संपल्यानंतरही तो भारतात बेकायदेशीररीत्या राहत होता. या कारवाईपूर्वी घाटकोपर पोलिसांनी वांद्रे येथील पाली व्हिलेज परिसरातून एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी 248 ग्रॅम वजनाचे एक्स्टॅसीच्या (एमडीएमए) गोळ्या आणि 6 किलो 544 ग्रॅम वजनाचे हायड्रो गांजाचा साठा जप्त केला. या ड्रग्जची किंमत 6 कोटी 54 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी 9 कोटी 31 लाखांचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. चारही आरोपींविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली होती.