

मुंबई : सुमारे 39 कोटींच्या हायड्रोपोनिक गांजासह आमीर पांपाडेन, मोहम्मद शफीर मदारी आणि सोहब खान या तिघांना छत्रपती शिवाजी महााज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी अटक केली.
बँकॉकहून येणार्या विमानातून काही प्रवासी हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी बँकॉकहून आलेल्या प्रत्येक संशयित प्रवाशासह त्यांच्या सामानाची तपासणी सुरू केली होती. याच दरम्यान आमीर आणि मोहम्मद शफीर या दोन्ही प्रवाशांना या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्यात 39 पॅकेट सापडली, या पॅकेटमध्ये 39 किलो 200 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजा असल्याचे उघडकीस आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात याच गांजाची किंमत 39 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे.
चौकशीदरम्यान त्यांना हा साठा बँकॉकमध्ये एका व्यक्तीने दिला होता. हा साठा विमानतळाबाहेर असलेल्या सोहब खान याला देण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे विमानतळाबाहेर असलेल्या सोहबला नंतर या अधिकार्यांनी अटक केली. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर तिन्ही आरोपींना रविवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.