Uddhav Thackeray : सध्या बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरत आहे; उद्धव ठाकरे यांचा घणाघात | पुढारी

Uddhav Thackeray : सध्या बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरत आहे; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : ”ही गर्दी पाहून विचार करा दसऱ्याला किती गर्दी असेल. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल, असे अश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. संजय राऊत हे नेहमी शिवसेनेचे असतील. मुलं पळवणारी टोळी ऐकली आहे, पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरत आहे.” असा घणाघात शिवसेनेतून फूटलेल्या शिंदे गटावर शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि. २१) गोरेगावच्या नेस्को सभागृहात केला.

दसरा मेळाव्या आधी झालेल्या या सभेत बोलत असताना त्यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेनेने केलेल्या कामांचा आढावा देत असताना ते म्हणाले की, दिवसरात्र हे माझे शिवसैनिक झटत आहेत. आज माझ्या हातात तुमचा आशिर्वाद आहे. मी जे नेहमी बोलतो ते करून दाखवतो. मुंबई महापालिकेच्या शाळा पहा. त्यामध्ये झालेल्या सुधारणा पहा. आम्ही जे करतो त्याची जाहिरात नाही करत. डबल डेकर बसेस या आम्ही आणल्या आहेत असा दावा त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा आढावा देत केंद्र सरकारच्या सध्याच्या कामावर ताशेरे ओढले. लम्पी आजाराविषयी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात गोमाता नाही का त्या काय फक्त दुसऱ्याच राज्यात आहेत का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ते पुढे असे म्हणाले की, पंढरीच्या वारीला याआधी आम्ही देखील परवानगी दिली होती. मंदिर उघडा असा दबाव असताना देखील मी लोकांच्या आरोग्याचा विचार करून रूग्णालये सुरू ठेवली. धारावीच्या झोपडपट्टीतील परिस्थिती किती वाईट होती हे माहित आहे आपल्याला. मी बाहेर पडलो नाही पण का ? कारण कोरोना काळात कोणाला बाहेर पडू दिलं नाही. शिवसेनेला फक्त बदनाम करण्याचं काम चालू आहे. सगळे सध्या एकत्र आहेत ते फक्त शिवसेना संपविण्यासाठी पण असं होणार नाही.

चित्त्या वरून नरेंद्र मोदी यांच्यावर ठाकरे यांची टिका

कामाचे काय ते बोला, आता काल परवा चित्ता आणला. चित्ता काय बोलत नाही, चित्ता आणला चांगली गोष्ट आहे. मात्र मी माझ्या लोकांसाठी काय करतो हे जास्त महत्वाचे आहे. आम्हीही पेग्विन आणले होते. मी तर फोटोग्राफर, मात्र फोटो काढायला विसरलो.

होय महाराजा म्हणण्यापेक्षा केंद्राकडे महाराष्ट्राची बाजू मांडा

सध्या कित्येकजणांच्या नोकऱ्या जात आहेत, वेदांत गेला त्याच्याबद्दल हे साफ खोटे बोलत आहेत. तो प्रकल्प पुन्हा आणा. एकेक उद्योग निघून जात आहेत. मिंधे असणारे फक्त शेपट्या हलवून होय महाराजा म्हणत आहेत. महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीत का बोलत नाही. पंतप्रधानांना हा प्रकल्प कसा काय गेला याचा जाब विचारा. हे होत नाही कारण प्रकल्पाबाबत हे अगोदरच ठरले होते. आम्ही जे करत आहोत तो फक्त महापालिका जिंकण्यासाठीचा हा विषय नाही. शिवसेना ही गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून तळागाळातील लोकांसाठी काम करते आहे. नैसर्गिक आपत्तींना सामोरी गेली आहे. प्रत्येकवेळेला धावून जातो तो शिवसैनिक असतो.

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बोलत असताना त्यांनी भाजपच्या कामाचा खरपूस समाचार घेतला. मनी लाँन्ड्रिग हे एकच विकासाचे आहे का? दुसरे प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत. लोकशाही म्हणत आम्हाला काही कळण्याआधी तुम्ही निर्णय जाहीर करता. ही लोकशाही आहे का? असे प्रश्न देखील ठाकरेंनी यावेळी उपस्थित केले

मुंबई महाापलिका महिन्याभरात घेऊन दाखवा

आज आमच्याकडे काहीही नाही. गेलेले आमदार गेल्या निवडणुकीतच पडलेले आहेत आणि जोरात कामाला लागा. जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी पंतप्रधान स्वत: येत आहेत. केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. आपले गद्दार देखील यामध्ये असणारच आहेत. हे वातावरण पाहून घाबरुन जाऊ नका. आपल्याला जमीन दाखवणाऱ्या अस्मान दाखविण्याची कामगिरी आपल्याला करायची आहे.

विरोधकांचे कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाहीत. आता मुस्लिम बांधव देखील शिवसेनेसोबत आहेत. कोरोनाच्या काळात मी भेदभाव न करता सर्वांचे प्राण वाचवले आहेत. हीच माझ्या आजोबांची वडिलांची शिकवण आहे. मी अमित शहा आणि केंद्रीय सत्तेला आव्हान देतोय की, हिंमत असेल तर मुंबई महाापलिका या महिन्याभरात घेऊन दाखवा.

काही गद्दार आणि मुन्नाभाई सोबत घेऊन राजकारण

सध्या फक्त शिवसेनेला संपविण्याचे काम सुरु झाले आहे. आपल्यातील काही गद्दार आणि मुन्नाभाई सोबत घेऊन राजकारण करत आहेत. ठाकरे घराणे संपविण्यासाठी सगळं काही सुरु आहे. माझ्यासोबत आता समोर असलेले कार्यकर्ते आहेत. संपवून दाखवा शिवसेना जर संघर्ष झाला तर तो गद्दारांसोबतच होईल. रक्तपात हा शिवसेनेच्या गद्दारांसोबतच होईल. कमळाबाईला काही होणार नाही. अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर टीका केल्या.

पक्षातर करत असणाऱ्या सदस्यांवर बोलत असताना ते म्हणाले की, ज्यांनी इमान विकलेले आहे त्यांनी लवकरात लवकर निघून जा. येवढी लख्ख गर्दी आज का होत आहे. कारण शिवसेना कणखर आहे. बाळासाहेबांना असं वाटलं पाहीजे की, मी उभा केलेला शिवसैनिक हा मर्द आहे.

यावेळी सभेसाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. शिवाजी पार्क मैदानावरच दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत खंडपीठासमोर उद्या (दि. २२) सुनावणी होणार आहे.

शिवाजी पार्कबाबत शिवसेना आक्रमक

शिवाजी पार्कला परवानगी न मिळाल्यास दुसरा कोणता पर्याय असू शकतो, याची चाचपणी शिवसेना आणि शिंदे गट करत होते. शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या मेळाव्याला मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने दुसरे पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहले. या पत्रात बीकेसीतील मैदानाची मागणी केली. तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानासाठी अर्ज केला होता. या चढाओढीत अखेर शिंदे गटानं बाजी मारली आहे.

या सर्व घडामोडींनंतर शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानात होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानावर पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा आयोजित केला जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवाजी पार्कबाबत शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा हा दसरा मेळावा कुठे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

हेही वाचा

Back to top button