उद्धव ठाकरे बोलावतील तिथे मेळावा; शिवसैनिकांचा पवित्रा | पुढारी

उद्धव ठाकरे बोलावतील तिथे मेळावा; शिवसैनिकांचा पवित्रा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळो अथवा न मिळो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिथे सांगतील तिथे आम्ही जमा होणार, शिवसैनिक शांत आहेत. प्रशासनाला हाताशी धरून त्यांची माथी भडकवू नका, अशी भावना शिवसेना पदाधिकारी आणि समर्थकांकडून व्यक्त होत आहे. शिवाजी पार्क मैदानावरील मेळाव्यास परवानगी नाकारल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी दिली आहे.

शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याला परवानगी देण्याबाबतच्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी उपनेते मिलिंद वैद्य आणि विभागप्रमुख महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने जी-उत्तरचे कार्यालय गाठले. मात्र, शिवसेनेच्या अर्जावर विधी व न्याय खात्याचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. त्यानंतरच निर्णय होईल, असे उत्तर पालिका अधिकार्‍यांकडून मिळाल्याचे शिवसेना पदाधिकार्‍यांनी सांगितले. प्रशासनाकडून आमच्या अर्जावर कोणतेच उत्तर दिले जात नाही. शांत शिवसैनिकांची माथी भडकावण्याचा सरकारचा उद्देश आहे का, असा सवाल वैद्य यांनी केला.

Back to top button