मुंबईकरांनाही घडणार चित्त्याचे दर्शन! राणीबागेत चित्ता आणण्यासाठी हालचाली सुरू | पुढारी

मुंबईकरांनाही घडणार चित्त्याचे दर्शन! राणीबागेत चित्ता आणण्यासाठी हालचाली सुरू

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांना स्थान मिळाल्यानंतर आता मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात चित्ता आणण्यासाठी पालिकेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसा प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनाही चित्त्याचे दर्शन घडणार आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीबाग) सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी चित्ता आणण्याची योजना पालिकेने हाती घेतली होती. यात चित्त्यासह पांढरा सिंह, चिम्पांझी, लेमूर, लेझर फ्लेमिंगो, हिप्पो, ईमू, जग्वार आदी प्राणी आणण्यात येणार होते. या संदर्भात निविदा प्रक्रिया राबवून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरीही घेण्यात आली होती. पण काही तांत्रिक कारणामुळे तीन वेळा निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे चित्त्यासह अन्य प्राण्यांचे आगमन लांबणीवर पडले. आता राणीबागेचे आधुनिकीकरण अंतिम टप्प्यात असून राणीबागेचा विस्तारही करण्यात येणार आहे. त्यामुळे येणार्‍या काळात देशी-विदेशी प्राणी राणीबागेत आणण्यात येणार आहेत.

या सर्व प्रक्रियेला दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे चित्त्याचे दर्शन अडीच वर्षांनंतर मुंबईकरांना होणार आहे. पहिल्या टप्प्यात जग्वार, चित्ता, रिंग टेल लेमूर, लेझर फ्लेमिंगो आणि दुसर्‍या टप्प्यात हिप्पो, ईमू आदी प्राणी टप्प्याटप्प्याने राणीबागेत आणण्यात येणार आहेत.पर्यटकांना देशी-विदेशी प्राण्यांचे दर्शन घडवण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे राणीबागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

Back to top button