कानाखाली मारल्याने एकाचा मृत्यू; चुनाभट्टी येथील घटना

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कानाखाली मारल्याने डोक्यात रक्तस्त्राव होत मानखुर्दमधील 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चुनाभट्टीमध्ये घडली. महेश भांबोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाविरोधात भादंवि कलम 304 (2) अन्वये मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करुन चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मानखुर्दमधील लल्लुभाई कंपाऊंड परिसरात रहात असलेल्या रोहीणी (39) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्यासोबत रहात असलेला भाऊ महेश हा चुनाभट्टी येथील एका वाईन शॉपमध्ये नोकरी करत होता. तो 20 वर्षाचा होईपर्यंत त्याला आकडी येण्याचा त्रास होता. यावर औषधे घेऊन तो बरा झाला. मात्र सध्या त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु होता. यावर तो उपचार घेत होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी महेश कामावर गेला होता. रात्री घरी परतलेला महेश हा अस्वस्थ असल्याचे रोहीणी यांना जाणवले. वाईन शॉपमध्ये चेष्टा मस्करी सुरु असताना सहकारी कृणाल गांजेकर (21) याने कानाखाली मारल्याचे त्याने सांगितले.