तलवारीने केक कापणे ‘बर्थडे बॉयला’ पडले महागात | पुढारी

तलवारीने केक कापणे 'बर्थडे बॉयला' पडले महागात

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वाढदिवस साजरा करताना भरस्त्यात 21 केक ठेवून केक तलवारीने कापणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी बर्थर्डे बॉय अरमान अमीत शेख याच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

अजिंक्य अहिरे हे एमएचबी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असून सध्या त्यांची नियुक्ती एटीएसमध्ये आहे. शनिवारी सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांना मोबाईलवर एक ट्विट आले होते. त्यात अरमान हा रात्रीच्या अंधारात एका टेबलावर 21 केक ठेवून तलवारीने केक कापत असताना दिसत होता. हा ट्विट विजय वंजारा याने केला असून त्यात भरस्त्यात अरमान केक कापतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले होते.

एपीआय सिद्धे, मोरे, शिंदे, बोंबे, घुगे, सोनावणे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. मात्र तिथे पोलिसांना कोणीही सापडले नाही. चौकशीअंती व्हिडीओमध्ये केक कापणार्‍या तरुणाचे नाव अरमान शेख असल्याचे उघडकीस आले. त्याचा 16 सप्टेंबरला वाढदिवस होता. तो बोरिवलीतील गणपत पाटील नगर, सलमान हॉटेलसमोरील गल्ली क्रमांक चौदामध्ये राहतो. घटनास्थळी अरमान सापडला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध नंतर पोलिसांनी घातक शस्त्र कलमासह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button