

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील झवेरी बाजार येथे रक्षा बुलियन आणि क्लासिक मार्बल्सच्या चार ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी करत 47.76 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने पारेख अल्युमिनेक्स लि. च्या संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई केली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, शोध कार्यादरम्यान रक्षा बुलियनच्या आवारात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. त्यानंतर ईडीच्या पथकाकडून या खासगी लॉकर्सची झडती घेण्यात आली. यात केवायसी, सीसीटीव्ही कॅमेरा, नोंदवही अशा नियमांचे उल्लंघन करुन हे लॉकर चालवले जात असल्याचे समोर आले. लॉकर परिसराच्या झडतीमध्ये एकूण 761 लॉकर्स होते. यातील तीन लॉकर्स हे रक्षा बुलियनचे होते. दोन लॉकरमध्ये 91.05 किलो सोने आणि 152 किलो चांदी सापडली. ईडीने ही मालमत्ता जप्त केली आहे. तसेच, रक्षा
बुलियनच्या आवारातून आणखी 188 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या ऐवजाची एकूण किंमत 47.76 कोटी रुपये असल्याचे ईडीने सांगितले.
दरम्यान, ईडीने 8 मार्च 2018 रोजी पारेख अल्युमिनेक्स लि. विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या
कंपनीने बँकांची फसवणूक करुन तब्बल 2 हजार 296.58 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर हे पैसे विविध कंपन्यांच्या माध्यमातून
पळवून नेण्यात आले.