मुंबई : ठाण्यातील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत | पुढारी

मुंबई : ठाण्यातील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सोमवारी 12 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत याबाबत प्राथमिक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या 14 गावांमधून दोन नवीन सदस्य महापालिकेत येतील.त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची सदस्य संख्या 111 वरून 113 होईल. राज्य सरकारने 25 वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेत समावेश केलेल्या या 14 गावांना ग्रामस्थांच्या आग्रहाखातर 2007 मध्ये वगळण्यात आले होते. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती
नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2021 ते मे 2022 कालावधीत मुदत संपणार्‍या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र ठाणे तालुक्यातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याची कार्यवाही सुरू असल्याने त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींमध्ये
निवडणुका झाल्या आणि त्यानंतर हद्दवाढीची कार्यवाही झाल्यास ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येईल. नव्याने स्थापित नागरी
प्राधिकरणांच्या निवडणुका घ्याव्या लागतील परिणामी निवडणुकीवर दुहेरी खर्च होईल. या बाबी विचारात घेता ठाणे तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठविले आहे.

महापालिकेच्या 2005 च्या निवडणुकीत याच 14 गावांनी जोरदार विरोध केला होता. जुन्या महापालिका मुख्यालयासमोर जाळपोळ, दगडफेक केली होती. ज्या उमेदवाराने अर्ज दाखल केला होता, त्याच्या घरावर दगडफेक करून जाळण्याचा प्रयत्न झाला होता. एवढा प्रखर विरोध या 14 गावांतील ग्रामस्थांनी करून आपला विरोध दर्शवला होता. त्यामुळे (दहिसर मोरी भागातील) ती 14 गावे नंतर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे 15 वर्षांपूर्वी वगळण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता. महापालिकेत 1995 आणि 2000
साली या गावातून दोन नगरसेवक निवडून आले होते. मात्र 2005 च्या पालिका निवडणुकीत येथील ग्रामस्थांनी 14 गावे महापालिकामुक्त करण्याचा एकजूट होऊन विरोध केला. महापालिकेने लागू केलेला मालमत्ता कर आणि येथील शासकीय जमीन पालिका ताब्यात घेणार या भीतीने ग्रामस्थांचा हा विरोध टोकाचा होता. त्यांनी पालिकेवर आणलेल्या मोर्चात मुख्यालयावर दगडफेक केली, तर येथील नेत्यांच्या नावाने शिमगा करण्यात आला. पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय 14 गाव संघर्ष समितीने जाहीर केला.
त्यामुळे निवडणुकीचा अर्ज भरण्याचा प्रयत्न करणार्‍या एका माजी नगरसेवकाचे घर पेटवण्यात आले.

राज्य शासनाने जून 2007 मध्ये ही गावे पालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या गावांच्या सुविधा ठाणे झेडपीकडून
पुरविण्यात येत होत्या. मात्र अपेक्षित सोयीसुविधा न पुरवल्याने गावांचा विकास खुंटला. अनधिकृत बांधकामे वाढली. राज्य
सरकारची या भागात सुमारे 800 एकर जमीन आहे. त्यावरही अतिक्रमण करून भूमाफियांनी हडप केली आहे. यानंतर पुन्हा नवी
मुंबई पालिकेत येण्याची इच्छा याच 14 गावांनी व्यक्त केली होती.

Back to top button