जूनपर्यंत महाराष्ट्रात असलेला फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेलाच कसा? आदित्य ठाकरेंचा सवाल | पुढारी

जूनपर्यंत महाराष्ट्रात असलेला फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेलाच कसा? आदित्य ठाकरेंचा सवाल

पुढारी ऑनलाईन: महाविकास आघाडी काळात फॉक्सकॉन  प्रकल्पासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली होती, हा प्रकल्प तळेगावात होणार होता; पण अचानक हा प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला? असा सवाल  शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

यावेळी आदित्‍य ठाकरे म्‍हणाले की, खोके सरकार राजकारणात व घराघरात फिरण्यात व्यस्त आहे. प्रशासन, कायदा सुव्यवस्थेवर कोणाचाच अंकुश नाही. खोके सरकारला माझी विनंती आहे की, पिस्तुल काढणं, धक्काबुक्की करणं, गुंडगिरीची भाषा करणं सोडून द्या. अशा मोठ्या इंडस्ट्रीज् ना राज्यात आणा, जेणेकरून तरुण बेरोजगारांना रोजगार मिळेल.

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी महाराष्ट्रात निर्माण झाली असती. जूनपर्यंत महाराष्ट्रात असणारी कंपनी अचानक गुजरातमध्ये कशी गेली, याचे उत्तर हे आत्ताच्या सरकारनेच द्यावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

स्वत:साठी खोके आणि जनतेसाठी धोके

फॉक्सकॉन  प्रकल्प हा महाराष्‍ट्रातून गुजरातला जाणे हा महाराष्ट्रातील जनतेला सध्याच्या सरकारने दिलेला हा सर्वात मोठा धोका आहे. या प्रकल्‍पामुळे महाराष्‍ट्रातील तरुणांना रोजगार मिळाला असता; पण सध्याचे सरकार हे  खोके सरकार आहे. या सरकारला गाटीभेटू घेण्यातून या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांचे  मोठे नुकसान झाले आहे. हे सरकार म्हणजे स्वत:साठी खोके आणि जनतेसाठी धोके, असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

Back to top button