मुंबई : 22 तास चालली लालबागच्या राजाची मिरवणूक

मुंबई : 22 तास चालली लालबागच्या राजाची मिरवणूक
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शुक्रवारी धो-धो कोसळणार्‍या पावसातही गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देणार्‍या भक्तांनी पावसाचाही मनमुराद आनंद लुटला. लालबागच्या राजाची मिरवणुक तर तब्बल 22 तास चालली. मुंबईत गणेश विसर्जनाला वरुण राजानेही हजेरी लावली. शुक्रवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या पावसाचा फटका काही प्रमाणात गणेश विसर्जन मिरवणुकीला बसला.

संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मिरवणुकांचा वेग वाढल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी
पावसानेही जोर पकडला. पाऊस वाढल्यानंतर मिरवणुका मार्गस्थ होण्यास वेळ लागला. मात्र,भर पावसात गणेश भक्तांनी विसर्जन केले. त्यात गिरगावसह दादर चौपाटी तसेच उपनगरांतील प्रमुख विसर्जनस्थळांचा समावेश होता. मुंबईत सर्व उपनगरांतील गिरगाव, दादर, माहीम, खार, जुहू, सात बंगला, वेसावे, गोराई आधी चौपट्यांसह पवई नैसर्गिक तलाव व कृत्रिम तलावांत शनिवारी पहाटेपर्यंत नैसर्गिक तलावांसह कृत्रिम तलावांमध्ये 37 हजार 513 बाप्पांचे विसर्जन झाले. यात 6 हजार 343 सार्वजनिक गणपती बाप्पांचा
समावेश होता. 31 हजार 170 घरगुती गणेशमूर्तींचेही याच मिरवणुकांनी विसर्जन केले.

नैसर्गिक विसर्जन स्थळी 5 हजार 548 सार्वजनिक गणेशमूर्तीं व 22 हजार 297 घरगुती मूर्तीं अशा 27 हजार 845 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. 226 गौरीचे विसर्जन झाले. कृत्रिम तलावात 795 सार्वजनिक गणेशमूर्तीं व 8 हजार 873 घरगुती मूर्ती अशा 9 हजार 668 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तसेच 82 गौरींचे विसर्जन झाले. मुंबईतील प्रथम विसर्जनास निघणारा मानाचा गणपती म्हणजे
गणेशगल्लीचा राजा. शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. हायड्रॉलिक ट्रॉली पद्धतीत विसर्जन करणारे पहिले मंडळ ठरले. लाखो भाविकांचे आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळीही दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी होते. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर शुक्रवारी याची पुनरावृत्ती झाली.

बॅन्ड, लेझीम यांच्यासोबत ढोल-ताशांच्या पथकाच्या गाजावाजामध्ये लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सकाळी 11 वाजताच्या  सुमारास लालबाग मार्केटमधून सुरुवात झाली. भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक, नागपाडा, सुतार गल्ली, माधवबाग, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. मात्र, दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे जवळपास सहा तास मिरवणूक लालबाग परिसरातच होती. प्रचंड गर्दीमुळे लालबागच्या राजाची मिरवणूक हळूहळू मार्गस्थ होत होती. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन सोहळ्यास सकाळी 10 वाजता विधिवत पूजा करून ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली. आरतीच्या तालावर निघालेल्या या विसर्जन मिरवणुकीत हजारो चिंतामणीभक्त सामील झाले होते. विसर्जन मार्गावर विभागीय सेवा साधना तसेच श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी मंडळाच्या वतीने गणरायावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शनिवारी सकाळी 8.34 वा. चिंतामणीचा विसर्जन सोहळा संपन्न झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news