

पुढारी डेस्क : मुंबई, ठाण्यासह कोकण भागात १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची (Maharashtra weather update) दाट शक्यता आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल. एकूणच मान्सून पुढील ४,५ दिवस राज्यात सक्रिय राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. आज १० सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ सप्टेंबर पर्यंत या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
उद्या ११ सप्टेंबर रोजी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे, अहमदनगर. बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या दोन दिवसांत कोल्हापूरसह कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Maharashtra weather update)
दरम्यान नाशिक शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचले. मुसळधार पावसाने अनेक दुर्घटना घडल्या असून वंजारवाडी येथे एक घर कोसळले. गणेश विसर्जनाच्या दिवशी ही दुर्घटना घडली. छबू सिताराम गवारे(38) व मंदाबाई छबू गवारे (35) या दोघा पती-पत्नीचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले, मात्र गंभीर मार लागल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा :