टीव्ही बंद केला म्हणून सुनेने छाटली सासूची बोटे, ठाण्याच्या अंबरनाथ येथील प्रकार; पतीच्याही कानशिलात लगावली | पुढारी

टीव्ही बंद केला म्हणून सुनेने छाटली सासूची बोटे, ठाण्याच्या अंबरनाथ येथील प्रकार; पतीच्याही कानशिलात लगावली

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; सासूने टीव्ही बंद केला म्हणून सुनेने सासूबाईंची तीन बोटे छाटून टाकल्याची घटना सोमवारी ठाण्यातील अंबरनाथ येथे घडली आहे. हे कमी म्हणून की काय, नंतर तिने पतीच्याही कानशिलात लगावली. याप्रकरणी सासूने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

सासू आणि सून यांच्यात काही कारणांवरून एरव्ही कुरबुरी होत असतात. मात्र, या घटनेत सून हिंसक झाली आणि तिने सासूबाईंवरच हल्ला केला. झाले असे की, सासूबाई घरात पूजा करण्यात मग्‍न होत्या. यावेळी त्या भजनही गात होत्या. मात्र, 32 वर्षीय सून घरात मोठ्या आवाजात टीव्ही पाहत बसली होती.

पूजा करताना मोठा आवाज येत असल्याने सासूने सुनेला टीव्ही बंद करण्यास सांगितले. तथापि सुनेने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर सासूने आवाज कमी करण्याची विनंतीही केली. त्याचाही उपयोग न झाल्यामुळे त्यांनी स्वत: उठून टीव्ही बंद केला. सासूने टीव्ही बंद केल्याचे पाहताच सून संतापली आणि तिने धारदार शस्त्राने हल्ला करत सासूच्या हाताची बोटे कापून टाकली. हा वाद पाहून महिलेचा पती दोघींमध्ये पडला. मात्र, पत्नीने त्यालाही मारहाण केली.

Back to top button