नवी मुंबईत शिंदे गटाचे ‘मिशन राष्ट्रवादी’ | पुढारी

नवी मुंबईत शिंदे गटाचे ‘मिशन राष्ट्रवादी’

नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भाजपाने बृन्हमुंबई महापालिका मिशन हाती घेतलेले असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांना नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अशोक गावडे यांच्यासह अन्य 5 नगरसेवक गळाला लागल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधार्‍यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची पाळेमुळे खिळखिळी करण्यावर भर दिल्याने फोडाफोडीच्या घडामोडी दिवसेंदिवस वेग घेत आहेत. नवी मुंबईच्या गडावर आ.गणेश नाईक यांनी साधारण 23 वर्षांपूर्वी पालिकेत सेनेचा पहिलावहिला भगवा फडकला होता. मात्र आ.नाईक यांनी 1999 ला राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने येथे राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व राहिले. कालौघात आ.नाईक यांनी महापौर जयवंत सुतार यांच्यासह 52 नगरसेवकांनी भाजपची वाट धरली. राष्ट्रवादीची वाताहत थांबवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी अशोक गावडे यांची निवड केली. गावडे यांनी प्रारंभी 15 नगरसेवकांना थोपवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

राष्ट्रवादीच्या विद्यमान शहराध्यक्षांनी आ. नाईक यांच्या बरोबर काम केल्याने त्यांचा निर्णय तेच घेतील अशी भूमिका भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे समजते. मंगळवारी माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या समवेत ऐरोलीत गावडेंबरोबर 5 नगरसेवकांची बैठक झाल्याचे खात्रीलायक वृत्त असून या नगरसेवकांमध्ये दिलिप बोराडे, स्वप्ना गावडे, राजू शिंदेंसह अन्य दोघांचा समावेश आहे. दरम्यान, गावडे यांनी पक्षांतराच्या केवळ अफवा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कामांच्या धडाक्यामुळे आमचा दबदबा कायम राहील. सर्वच पक्षांतील अनेक पदाधिकारी लवकरच आमच्यात सामील होतील.
– विजय नाहटा, उपनेते, (शिवसेना शिंदेगट)

Back to top button