

शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणी घ्यायचा, याचा निकाल अखेर न्यायालयाने शुक्रवारी दिला. अस्तित्वासाठी गेल्या काही महिन्यांपासून सतत संघर्ष करीत असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यामुळे मोठाच दिलासा मिळाला. शिवतीर्थ, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान. ते शिवसेनेसाठी जसे अत्यंत महत्त्वाचे तसेच शिवसैनिकांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. याच शिवाजी पार्कपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर शिवसेना भवन आहे. ही दोन्ही महत्त्वाची स्थळे दादरमध्ये असल्याने तमाम शिवसैनिकांच्या द़ृष्टीने दादर म्हणजे तीर्थक्षेत्रच! एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेवरच दावा करताना तिच्या अनेक शक्तिस्थळांवर हक्क सांगितला. शिवसेनेच्या स्थापनेपासून दरवर्षी दसर्याला शिवाजी पार्कवर होणारा मेळावा हा याच शक्तिस्थळांपैकी एक.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली जाहीर सभा याच शिवाजी पार्कवर घेतली आणि मराठी माणूस व महाराष्ट्र हा आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असेल याची घोषणा केली. 19 जून 1966 रोजी दादरमध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यानंतरच्या दुसर्याच वर्षापासूनच बाळासाहेबांनी शिवतीर्थावर सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा गेली 56 वर्षे सुरूच आहे. यावर्षी मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते शिवसेनेवर दावा सांगत थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. हे असे कधी घडले नव्हते. जे नेते बाहेर गेले त्यांनी स्वतःची वेगळी वाट निवडली. शिवसेनेवर यापूर्वी कुणी दावा केला नव्हता. आता ते झाल्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व चांगलेच गोंधळून गेले आहे. उद्धव आणि शिंदे यांच्यातल्या वादावर निवाडा होईल तेव्हा होईल; पण तूर्त तरी शिवतीर्थावरचा दसरा मेळाव्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांच्याच गटाकडे असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. मेळाव्यासाठी परवानगी मागणार्या उद्धव ठाकरे गटाच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी मुंबई महापालिकेने लावलेला विलंब, हाच या निकालासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसते. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून दसरा मेळाव्यास संबोधित करण्याचे भाग्य लाभले नाही. गेली दोन वर्षे खंडित झालेली ही परंपरा यंदा हायकोर्टातून आदेश घेऊन पुन्हा एकदा सुरू होत आहे. शिवसेनेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपात बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकूणच ठाकरे कुटुंबाची शिवसेनेवरील पकड सैल झाल्याचे चित्र निर्माण झाले आणि ठाकरे यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले गेले आहे. दुसरे म्हणजे, मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. भाजपने शिवसेनेची सत्ता उखडून टाकण्याचा चंग बांधला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या आव्हानांना कसे तोंड देणार, याची चुणूक यंदाच्या मेळाव्यात दिसेलच!
उद्धव यांनी भावनिक आवाहन करून मुंबईतला कट्टर शिवसैनिक आपल्यासोबत राहील, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवाय, मुंबई महापालिकेवर आपलाच झेंडा कायम राहावा, याचेही आव्हान ठाकरे यांच्यासमोर आहे. शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी कोर्टाकडूनच परवानगी मिळाल्याने मुंबईतल्या शिवसैनिकांच्या मनात ठाकरे यांचेच स्थान पक्के राहील. दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटाने बीकेसीच्या मैदानात आपला दसरा मेळावा घेण्याचे ठरवले आहे. दसर्याच्या दिवशी विचारांचे सोने लुटायला वाजत-गाजत या, असे आवाहन वर्षानुवर्षे शिवसैनिकांना ठाकरे यांच्याकडून होत असते. यंदा शिंदे गटाने आव्हान दिल्यानंतर काय काय लुटले जाते, हे पाहावे लागेल!
यानिमित्ताने शिवसेना आणि शिवाजी पार्क यांच्या नात्यावर नव्याने चर्चा सुरू झाली. शिवसेनेच्या स्थापनेपासून हे नाते घट्ट असले, तरी शिवसेनेच्या 56 वर्षांच्या इतिहासात पाचवेळा या मैदानावर शिवसेनेला दसरा मेळावा घेता आला नव्हता. 2006 मध्ये प्रचंड पावसामुळे शिवाजी पार्कात झालेल्या चिखलामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. 2009 आणि 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या दोन्ही वर्षांचा दसरा मेळावा होऊ शकला नाही. तर 2020 चा दसरा मेळावा कोरोनाच्या सावटामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात घ्यावा लागला होता. 2021 चा दसरा मेळावादेखील कोरोनामुळेच षण्मुखानंद सभागृहात घ्यावा लागला होता.
– उदय तानपाठक