भाजप नेत्यांच्या शिवतीर्थावरील सदिच्छा भेटी वाढल्या! | पुढारी

भाजप नेत्यांच्या शिवतीर्थावरील सदिच्छा भेटी वाढल्या!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या सदिच्छाभेटींचे प्रमाण सध्या भलतेच वाढले आहे. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या सोमवारच्या भेटीगाठीनंतर मंगळवारी भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

राज आणि आमचे वैचारिक साम्य आहे, असे सांगतानाच बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे यांची केवळ सदिच्छा भेट घेतली. शिवाय उद्यापासून गणेशोत्सवदेखील आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. राज ठाकरे हे मोठ्या भावासारखे असून, ते नेहमी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. राज आणि आमचे वैचारिक साम्य आहे. ते नेहमी हिंदुत्वाची बाजू मांडून रक्षण करत आले आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेणे गैर नाही. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजप-मनसे युती होणार का, या प्रश्नावर बावनकुळे यांनी दिल्लीकडे बोट दाखवले. ते म्हणाले, युतीचा निर्णय हा केंद्रातील वरिष्ठ नेते अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि देवेंद्र फडणवीस घेतात. प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे काम हे पक्ष कसा वाढेल आणि त्यासाठी काय काय करता येईल हे करणे आहे. त्यामुळे युती करणे, भविष्यात काय रणनीती असणार याचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Back to top button