

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : हरिहरेश्वर-श्रीवर्धन समुद्रकिनार्यावर संशयास्पद अवस्थेत सापडलेली बोट आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉटस्अॅप क्रमांकावर आलेल्या धमक्यांचे मेसेज या पार्श्वभूमीवर बुधवारपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईत हायअलर्ट जारी करत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई पोलीस दलातील 35 हजार अधिकारी आणि अंमलदारांचा फौजफाटा दिवस-रात्र तैनात असेल. मुंबई पोलिसांच्या दिमतीला अतिरिक्त पोलीस फोर्स देण्यात आला आहेत. यात शीघ्र कृती दल, फोर्स वन, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वानपथक, सशस्त्र दल, राज्य राखीव बलाचा समावेश आहे. गणेशोत्सवात गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वानपथके आणि मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातूनही पोलीस संशयीत व्यक्ती आणि बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. साध्या वेषातील पोलिसांनाही तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करुन संशयित वाहने, सामान आणि व्यक्ती, हॉटेल्स, लॉज यांची तपासणीही सुरु केली आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई या महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणी वाहतूक पोलिसांचे विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
मुंबईत गणेशोत्सव काळात शहरातील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यासोबतच रस्त्यांवर मालवाहू अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल. 54 रस्ते एकदिशा मार्ग आणि 114 ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आले आहे.