मुंबई : आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच – उद्धव ठाकरे | पुढारी

मुंबई : आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच - उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  दसर्‍याला शिवाजी पार्कवर आमचाच मेळावा होणार, याबाबत कोणताही संभ्रम नाही. संभ्रम निर्माण करणार्‍यांनी खुशाल तसे प्रयत्न करावेत. पण यात बदल होणार नाही. महापालिका परवानगी देईल अथवा न देईल, आम्हाला काही फरक पडत नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रतिस्पर्धी शिंदे गटाला ठणकावले.

दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. त्यामुळे तो कसा आणि कुठे साजरा करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे सांगत शिंदे गटाचे प्रवक्‍ते दीपक केसरकर यांनी भूमिका गुलदस्त्यातच ठेवल्याने या प्रकरणावर अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. मात्र
कोणी कितीही संभ्रम निर्माण करू देत, शिवतीर्थावर आमचाच दसरा मेळावा होणार, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांसह विविध राजकीय,  सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी
शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी दसरा मेळाव्यासाठी महापालिकेची परवानगी मिळाली नसल्याबद्दलचा प्रश्‍न विचारला असता ठाकरे म्हणाले, राज्यातील तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक-मांत्रिक भाग आहे. ते नंतर बघू; पण आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असे ठाकरे यांनी सांगितले.

साधारण सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशाची रांग लागते. पण, आज महाराष्ट्रात वेगळे चित्र दिसत आहे. वंचित, बहुजन असे विविध घटक शिवसेनेत येत आहेत. हिंदुत्ववादी आणि मुस्लिम कार्यकर्तेसुद्धा प्रवेशासाठी उत्सुक आहेत. महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही. शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी आवई भाजपने उठवली होती. परंतु आज विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने त्या आवईला छेद दिला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेना म्हणजे रस्त्यावरची वस्तू नव्हे

शिवसेना आणि शिवसैनिक आहे तिथे ठाम आहेत. शिवसेना म्हणजे काही रस्त्यावरील वस्तू नाही, की कोणीही उचलून खिशात टाकावी. शिवसेनेला 56 वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षांत असे 56 लोक आम्ही पाहिले आहेत. शिवसेना ही निष्ठावंतांच्या रक्‍तावर मोठी होणारी आहे, गद्दारांच्या नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे गटाला फटकारले.

विहिंप कार्यकर्ते शिवसेनेत

विश्‍व हिंदू परिषदेचे उद्धव कदम यांच्यासह कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी आपल्या समर्थकांसह आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Back to top button