मुंबई : लग्नास नकार मिळाल्याने तरुणीचा लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

मुंबई : लग्नास नकार मिळाल्याने तरुणीचा लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने एका 22 वर्षीय तरुणीने शनिवारी दोन वेळा भायखळा रेल्वे स्थानकात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. आत्महत्येचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा वेगाने येणार्‍या लोकलसमोरच ती उभी राहिली. या घटनेमुळे स्थानकातील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.मात्र त्याचवेळी मध्य रेल्वे आरपीएफ,मोटरमन आणि एका प्रवाशांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणीला रुळांवरुन बाजूला केल्याने तिचे प्राण वाचले. या तरुणीचे प्राण वाचविणारे आरपीएफ सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र सानप यांचे कौतुक होत आहे.

मानसी पाटील (22 वर्ष,नावात बदल केला आहे) या तरुणीचे एका 30 वर्षीय तरुणावर प्रेम होते.शनिवारी,27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पावणे 6 च्या सुमारास ते दोघेही भायखळा स्थानकात आले होते. मानसीने आपण शक्य तितक्या लवकर लग्न करू, अशी मागणी तरुणाकडे केली. मात्र तरुणाने त्यास नकार दिल्याने मानसीने आत्महत्या करणार्‍यासाठी भायखळा स्थानकातील डाउन दिशेच्या फलाट क्र. 1 वरील रुळांवर उतरुन येणार्‍या लोकलसमोर उभी राहिली.

एक तरुणी लोकलसमोर उभी असल्याचे पाहून स्थानकात कर्तव्यावर असलेले आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र सानप आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी गजानन मुसले आणि अन्य प्रवाशांनी तिची समजूत काढून तिला रुळांवरुन बाजूला हटविले. परंतु मानसी पुन्हा प्लटफार्म 2 वरून रुळांवर उतरुन चिंचपोकळीच्या दिशेने जाऊ लागली. तिचा आवेश पाहून सानप यांनी धावत जाऊन समोरून येणारी लोकल हात उंचावून थांबविण्याचा प्रयत्न केला.
मोटरमननेही गाडीचा वेग कमी करुन सतत हॉर्न वाजविले. त्यानंतर धावत आलेल्या सानप यांनी तिला रुळांवरुन बाजूला केले. त्यानंतर पोलिसांनी दोघांची समजून काढल्यानंतर दोघांनी माफी मागितली.

Back to top button