मुंबईत मद्य तस्करांवर ‘वॉच’ | पुढारी

मुंबईत मद्य तस्करांवर ‘वॉच’

मुंबई; गणेश शिंदे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. उत्सवाच्या बंदोबस्तात पोलीस व्यस्त असल्याची संधी साधून मद्य तस्कर सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 45 भरारी पथकांचा मद्य तस्करी करणार्‍यांवर ‘वॉच’ राहणार असून त्यांनी या तस्करांचे मनसुबे धुळीस मिळवण्याचा चंग बांधला आहे. राज्यातील सर्व विभागीय उपायुक्त व अधीक्षक यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गणेश भक्तांची बाजारात खरेदीसाठी लगबग सुरु आहे. गणेशोत्सव कालावधीत विषारी मद्यसेवनामुळे दुर्घटना घडू नये तसेच अवैध मद्यविक्रीमुळे शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. गणेश चतुर्थी व सार्वजनिक गणेश विसर्जन (अनंत चतुर्दशी) हे दोन दिवस ‘ड्राय डे’ असतात. त्यामुळे या दिवशी चोरट्या पद्धतीने मद्याची वाहतूक होण्याची शक्यता असते. यावर ही पथके करडी नजर ठेवणार आहेत. विशेषत: मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, गोवा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड तसेच दमण, दादरा व नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर येतात. या 9 सीमांवर 40 तपासणी नाके आहेत. या नाक्यांवर प्रत्येक वाहनांची तपासणी अधिकारी, कर्मचारी करणार आहेत.

राज्यात एक एप्रिल ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत 18 हजार 300 केसेस दाखल झाल्या. 14 हजार 95 आरोपींना जेरबंद करण्यात राज्य उत्पादन शुल्काला यश आले. 1114 वाहने जप्त करण्यात आली. सुमारे 60 कोटी 25 लाख 34 हजार 804 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर गुन्हे अन्वेषण विभागाने एक एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 47 हजार 749 एकूण गुन्हे दाखल केले. या कारवाईत एकूण 35 हजार 54 संशयित आरोपींना अटक करण्यात आली तर सुमारे 144 कोटी रुपयांचा मुद्देमाल विभागाने जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राज्यसरकारच्या तिजोरीत गतवर्षात सुमारे 17228 कोटी रुपये इतका महसूल जमा झाला.आता एक एप्रिल ते 31 जुलै 2022 या 4 महिन्याच्या कालावधीत सुमारे 6139 कोटी रुपये इतका महसूल प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

Back to top button