चहाही देणार नाही; मते द्यायची तर द्या! नितीन गडकरी यांचे आणखी एक परखड वक्तव्य | पुढारी

चहाही देणार नाही; मते द्यायची तर द्या! नितीन गडकरी यांचे आणखी एक परखड वक्तव्य

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पुढील लोकसभा निवडणुकीत मी माझे पोस्टर लावणार नाही. कोणाला चहापाणीही देणार नाही. मते द्यायची असतील तर द्या, नाहीतर नका देऊ, असे परखड वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.

बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे नितीन गडकरी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. अंधेरी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट या शैक्षणिक संस्थेच्या दीक्षान्त समारंभात गडकरी यांचे भाषण झाले. ते म्हणाले, गेल्या 40 वर्षांपासून मी राजकारणात आहे. मात्र आजपर्यंत मी कधीही माझे स्वतःचे अथवा दुसर्‍याचे कटआऊट लावलेले नाहीत. तरीदेखील प्रत्येक निवडणूक मी जिंकत आलो आहे. माझे नाव आता सर्वांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मी पुढील निवडणुकीत साधे पोस्टर लावणार नाही की कोणाला चहापाणीही देणार नाही. ज्या कोणाला मला मत द्यायचे असेल ते देतील. नाही द्यायचे असेल तर नका देऊ. निवडणुकीत जनताच मायबाप असते. चांगले काम करणारी माणसेच त्यांना हवी असतात. त्यामुळे मला लोक मते देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इतकी वर्षे मी राजकारणात आहे. मात्र कोणाच्या गळ्यात मी कधी हार घातला नाही. माझ्या स्वागतासाठी कधीच कोणी येत नाहीत, निरोप द्यायलाही कोणी येत नाहीत. तरीही प्रत्येक निवडणुकीत ते मला भरघोस मतांनी निवडून देतात, असे गडकरी म्हणाले. तुम्ही चांगले काम करीत असाल तर कोणत्याही दिखाऊपणाची गरज नाही, असे गडकरी म्हणाले. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट या संस्थेला उद्देशून ते म्हणाले की, चांगल्या लोकांना ट्रेन करा, गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. मी भाजपचा अध्यक्ष असताना खासदार-आमदारांसाठी सिलॅबस तयार केला होता. तसा सिलॅबस तुम्ही नगरसेवकांसाठी तयार करा, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button