मुंबई महापालिकेच्या कामगारांना बायोमेट्रिक हजेरीचा फटका; ऐन गणेशोत्सवात कामगारांच्या पगारात कपात! | पुढारी

मुंबई महापालिकेच्या कामगारांना बायोमेट्रिक हजेरीचा फटका; ऐन गणेशोत्सवात कामगारांच्या पगारात कपात!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सदोष बायोमॅट्रीक हजेरी मशिनमुळे हजारो कामगारांचा ऑगस्ट महिन्याचा पगार कापला गेला आहे. ऐन गणेशोत्सवात पगार कापला गेल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान बुधवारी म्युनिसिपल मजदूर युनियनने पालिका अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेऊन, कापलेला पगार तातडीने कामगारांना मिळावा, अशी आग्रही भूमिका मांडली. याला अतिरिक्त आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महानगरपालिकेच्या विविध खात्यामध्ये कर्मचार्‍यांची दररोज हजेरी घेण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या बायोमॅट्रीक हजेरी मशिन खरेदी करण्यात आल्या आहेत. 20 कामगारांमागे एक मशिन देण्याचे पालिकेचे धोरण होते. तसे आदेशही आयुक्तांनी काढले होते. परंतू आजही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सफाई कामगारांच्या एका चौकीवर सरासरी 70 ते 80 कामगारांसाठी फक्त एक मशिन उपलब्ध आहे.

या मशीनही अनेकदा बंद पडत असल्यामुळे कामगारांना दूरवर असलेल्या मशिनकडे पळावे लागत आहे. बायोमॅट्रीक मशिनवर हजेरी नोंदवताना अनेकदा इंटरनेट उपलब्ध होत नाही. त्यामुळे कामावर उपस्थित असूनही कामगारांची हजेरी नोंदवली जात नाही.

बायोमेट्रिकमधील तांत्रिक अडचणीमुळे ऐन गणेशोत्सवामध्ये ऑगस्ट महिन्याचा प्रत्येक कामगाराचा 20 ते 25 हजार रुपये पगार कापला गेला आहे. काही कामगारांच्या हातात तर शून्य पगार आला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या कामगारांना पगार न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली असल्याचे मुनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले. याकडे लक्ष वेधण्यासाठी मजदूर युनियनच्या पदाधिकार्‍यांनी पालिका अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांची भेट घेतली. अतिरिक्त आयुक्त यांनी तांत्रिक कारणामुळे कामगारांचे पगार कापले गेले असतील तर ते तातडीने देण्यात यावे, असे निर्देश लेखापाल विभागाला दिले.

Back to top button