अंधेरीत शाळकरी मुलीची हत्या; अपहरण करून तीक्ष्ण हत्याराने वार | पुढारी

अंधेरीत शाळकरी मुलीची हत्या; अपहरण करून तीक्ष्ण हत्याराने वार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंधेरी येथून अपहरण करण्यात आलेल्या एका पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलीची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीचा मृतदेह नायगाव रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या एका बॅगेत सापडला. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह बॅगेत टाकून मारेकर्‍याने पलायन केल्याचा संशय आहे. दरम्यान तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतरच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला की नाही याबाबत खुलासा होणार आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी अपहरणासह हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्‍यांचा शोध सुरु केला आहे.

या गुन्ह्याचा अंधेरी पोलिसांकडूनही समांतर तपास सुरु आहे. 46 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पती आणि दोन मुलीसोबत अंधेरी परिसरात राहते. तिचे पती सेल्समन म्हणून कामाला आहे तर मृत लहान मुलगी सध्या विलेपार्ले येथील एका शाळेत शिकते. सकाळी पावेबारा वाजता ती रिक्षाने शाळेत जाते आणि सायंकाळी सव्वासहापर्यंत घरी येते. गुरुवारी ती लवकरच शाळेसाठी निघून गेली. मात्र सायंकाळी साडेसहापर्यंत घरी आली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध सुरु केला. शाळेत जाऊन चौकशी केली असता शाळा बंद होती. तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केल्यानंतर ती गुरुवारी शाळेत आली नसल्याचे तिच्या पालकांना समजले होते. मित्र-मैत्रिणीकडे चौकशी करुन परिसरात सर्वत्र शोध घेतल्यानंतर ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी अंधेरी पोलिसांत तिच्या मिसिंगची तक्रार केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता.

शाळेच्या गणवेशात मृतदेह सापडले

शुक्रवारी दुपारी तीन वाजता नायगाव रेल्वे स्थानकाजवळील फुटपाथवर एक संशयित बॅग पोलिसांना सापडली होती. या बॅगेची तपासणी केल्यानंतर पोलिसांना एका पंधरा वर्षांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आला. ती शाळेच्या गणवेशात होती. तिच्या शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचे बाराहून अधिक जखमा होत्या. तिच्याकडे सापडलेल्या शाळेच्या ओळखपत्रावरुन तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. शाळेत चौकशी केल्यानंतर ती मुलगी गुरुवारी सायंकाळपासून मिसिंग असल्याचे उघडकीस आले.

Back to top button