शिंदे सरकारचा निशाणा शिवसेनेच्या बलस्थानावर | पुढारी

शिंदे सरकारचा निशाणा शिवसेनेच्या बलस्थानावर

मुंबई; दिलीप सपाटे : राज्यात सत्तांतर होऊन शिंदे गट व भाजपची सत्ता आल्यानंतर विधिमंडळाचे पहिलेच छोटेखानी पावसाळी अधिवेशन गुरुवारी पार पडले. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बलस्थान असलेली मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे स्पष्ट झाले. मुंबईकरांसाठी विविध घोषणांचा पाऊस पाडतानाच शिवसेनेची नाकाबंदी करण्यासाठी मुंबई महापालिकेभोवती चौकशीचा फास आवळण्याची खेळीही केली.

शिवसेनेचा खरा जीव हा मुंबई महापालिकेत आहे. शिवसेनेच्या अर्थकारणाचे केंद्र हीच महापालिका आहे हे भाजपला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे भाजपने 2017 च्या निवडणुकीत या बलस्थानाला हादरा देण्याचा ताकदीनिशी प्रयत्न केला; पण तो थोडक्यात हुकला. यावेळी मात्र पुन्हा हाती आलेली सत्ता, त्यातच शिंदे यांच्यासह मुंबईतील काही शिवसेना आमदारही हाती लागल्याने भाजप यावेळी ही संधी दवडणार नाही. त्यामुळेच भाजपने आमदार आशिष शेलार यांच्या खांद्यावर मंत्रिपदाऐवजी मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली आहे. एकंदरच या अधिवेशनात विविध चर्चेला दिलेल्या उत्तरातून राज्यातील सत्ता हाती घेतल्यानंतर शिंदे – फडणवीस यांचे मुंबई महापालिकेची सत्ताही काबीज करण्याचे मनसुबे स्पष्ट झाले.

अजित पवार जबाबदार विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेत!

बंड यशस्वी करून मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे हे सरकारवर हल्ला करत असताना विरोधक मात्र संयमित भूमिकेत होते. महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीने सभागृहात संयमाची भूमिका घेतली. विधान भवनाच्या पायर्‍यांवर झालेला गोंधळ वगळता सभागृहात या दिवसात विरोधी पक्षाचा कोणीही आमदार वेलमध्ये आला नाही, कोणी घोषणाबाजी केली नाही, कोणता सभात्याग झाला की कामकाज बंद पडले नाही. उलट विधानसभेत तर सकाळी साडेनऊपासून ते रात्री उशिरापर्यंत कामकाज झाले. मागील अडीच वर्षात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारला अडचणीत आणण्याची कोणतीही संधी सोडली नव्हती. मात्र विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनात अजित पवार हे जबाबदार विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेत दिसले. सरकारवर आरोप करताना अजित पवार यांनी या अधिवेशनात कामकाज बंद पाडण्याची भूमिका घेतली नाही. विरोधी पक्षात अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नाना पटोले असे अनेक दिग्गज नेते आहेत. मात्र हे पहिले अधिवेशन असताना त्यांनी कटुता टाळत कामकाज करण्यावर भर दिल्याचे दिसले.

समर्थक आमदारांचा शिंदेंना गराडा

शिवसेना आणि अपक्ष मिळून 50 आमदारांच्या पाठबळावर सत्तेत मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे हे आपल्या गटाच्या आमदारांचा वेढ्यात असल्याची परिस्थिती सभागृह आणि सभागृहाबाहेर दररोजच दिसून आली. मुख्यमंत्री सभागृहात असताना आमदारांनी पत्रावर स्वाक्षर्‍या घेणे हा अपवाद आता नियमित झाला आहे. पण यावेळी समोर सुरू असलेल्या चर्चेचे भान न ठेवता शिंदे गटाचे आमदार त्यांना गराडा टाकत होते. त्यामुळे अधिवेशनात जवळपास दररोजच अजित पवार यांना या आमदारांना आवरण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना करावी लागत होती. एकूणच हे अधिवेशन छोटेखानी असले तरी त्यात निर्णय मात्र अधिक झाले.

Back to top button