

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सवात कोकणात जाणार्या चाकरमान्यांना यंदा वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वे, एसटी फुल्ल झाल्याने चाकरमानी खासगी ट्रॅव्हल्सने गाव गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु खासगी
ट्रॅव्हल्सने तिकिटाचे दर वाढविल्याने चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. दुसरीकडे मुंबई-गोवा मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने प्रवास धोकादायक झाला आहे.
मध्य रेल्वेतर्फे गणेशोत्सवाकरिता नियमित गाड्यांशिवाय 216 विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. एसटी महामंडळाच्या 3200 गाड्या
फुल्ल झाल्या आहेत. चाकरमान्यांना रेल्वे, एसटीचे तिकीट मिळत नसल्याने चाकरमान्यांनी खासगी ट्रॅव्हल्सकडे आपला मोर्चा वळविला आहे. परंतु याकरिता प्रवाशांना अव्वाच्यासव्वा भाडे मोजावे लागत आहे. मुंबई, ठाण्यातून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत एसी स्लीपर बसकरिता दोन हजार 200 ते अडीच हजार रुपये भाडे आकारण्यात येत आहे. चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, नागपूर, कोल्हापूर यासह अन्य ठिकाणी जाणार्या बसचा प्रवास देखील महाग झाला आहे. अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने अनेकांना नाईलाजाने खिशाला कात्री लावून कोकणाची वाट धरावी लागत आहे.
गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा कोकणात जाण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. रेल्वे, एसटीचे तिकीट मिळत नसल्याने वैयक्तिक वाहन घेऊन जाणार्यांचीही संख्या यावेळी जास्त आहे. परंतु मुंबई-गोवा मार्गावर खड्डेच खड्डे असल्याने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर 24 ठिकाणी खड्डे आहेत. यामध्ये सर्वाधिक वाकण पट्ट्यात आठ आणि महाड पट्ट्यात सात ठिकाणी, तर पळस्पे, कशेडी, चिपळूण या पट्ट्यातही खड्डे मोठया प्रमाणात आहेत. मुंबई-गोवासह अन्य महामार्गावरून कोकणाकडे
जाणार्या रस्त्यांवरही खड्डे आहेत.