मुंबईत पोलिसांना स्वस्तात घरे : फडणवीस | पुढारी

मुंबईत पोलिसांना स्वस्तात घरे : फडणवीस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी विविध घोषणा केल्या. मुंबईतील 29 हजार सफाई कामगारांना मालकी हक्‍काची घरे देण्याबरोबरच पोलिसांसाठी
गृह संकुल आणि बीडीडी चाळीचा पुनर्विकास करताना पोलिसांच्या घरांच्या किमती 25 लाखांपेक्षाही कमी करण्याचे त्यांनी जाहीर केले.

मुंबईतील झोपडपट्ट्या आणि त्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्‍न याबरोबरच मुंबईतील अन्य प्रश्‍नांच्या मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षाच्या वतीने चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेला गृहनिर्माणमंत्री म्हणून फडणवीस यांनी उत्तर दिले. सर्वच बाबतीत सकारात्मक भूमिका घेत त्यांनी विविध घोषणा केल्या.

मुंबई पालिकेच्या कारभाराची चौकशी

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील काही पारंपरिक रस्ते बंद करून, काही रस्त्यांची रुंदी कमी करून त्याची जागा विकसकांना एफएसआयच्या रूपाने देण्यात आल्याचे समोर आले आहे. बदललेला आराखडा योग्य नसल्याचे सांगत यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे की नाही? याची चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पोलिसांची आणखी सात हजार पदे भरणार

मुंबई : राज्यात सध्या सात हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, याशिवाय आणखी सात हजार पोलिस भरती केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. नवी मुंबईतील आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील अवैध धंद्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. त्यांनी नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी बोलताना आणखी पोलिसांची भरती करण्याची आवश्यकता असल्याची मागणी केली होती.

गिरणी कामगारांना 50 हजार घरे

गिरणी कामगारांना घरे देण्याचा शासनाचा मानस असून, हे सरकारचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांना सुमारे 50 हजार 900 घरे उपलब्ध करून देण्याचा कोकण म्हाडा मंडळांतर्गत प्रयत्न सुरू आहे.

Back to top button