मुंबई : पतीने पत्नीला धावत्या एक्स्प्रेसखाली ढकलले | पुढारी

मुंबई : पतीने पत्नीला धावत्या एक्स्प्रेसखाली ढकलले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  चारित्र्याचा संशय घेणार्‍या पतीने पत्नीला धावत्या एक्सप्रेस खाली ढकलून ठार मारल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे वसई रोड स्थानकात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन लोहमार्ग पोलिसांनी आरोपी पतीला अवघ्या 12 तासांच्या
आत बेड्या ठोकल्या आहेत.

यातील आरोपी पती हा रंगकाम करत असून भिवंडीतील टेमघर परिसरात रहात होता. तो सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास हे दोघेजण वसई रोड स्थानकात आले होते. येथेही
दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर आरोपी पतीने पत्नीला फलाट क्रमांक पाचवरुन एक्स्प्रेस खाली ढकलले. याप्रकरणी वसई रोड पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

वसई रोड पोलिसांसोबतच लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हेशाखेनेही याचा समांतर तपास सुरु केला. घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची माहिती काढण्यासा सुरुवात केली. आरोपी हा भिवंडीतील टेमघर परिसरात रहात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पत्नी वरील चारित्र्याच्या संशयावरुन आणि घरगुती वादातून हे कृत्य केल्याची कबुली दिली.

Back to top button