मुंबई : गणेशोत्सव काळात बेस्ट देणार मुंबईकरांना रात्रभर सेवा ! | पुढारी

मुंबई : गणेशोत्सव काळात बेस्ट देणार मुंबईकरांना रात्रभर सेवा !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवादरम्यान शहरातील विविध गणपतीचे प्रवासी, पर्यटकांना दर्शन घेता यावे, यासाठी बेस्ट उपक्रमाने 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान 25 विशेष बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत या बस धावणार आहेत. त्यामुळे प्रवासी, पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बुधवारी 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे तब्बल दोन वर्षानंतर यंदा गणेशोत्सव साजरा होणार असल्याने सगळीकडे उत्साह आहे. शहरातील विविध भागातील गणपती, देखावे पाहण्यासाठी भाविक रात्रभर फिरतात. परंतु वाहतुकीचे सोय नसल्याने गैरसोय होते. मुंबईकरांची ही गैरसोय दूर करण्यासाठी बेस्टने 25 विशेष बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार बसची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

डबलडेकर हेरिटेज बसद्वारे घ्या गणेशाचे दर्शन

31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान दक्षिण मुंबईतील विविध गणपती मंडळांना विशेषतः फोर्ट, गिरगाव, खेतवाडी, लालबाग, भायखळा येथे रात्रीच्या वेळी गणपतीच्या दर्शनासाठी येणारे प्रवासी, भाविकांच्या सोयीसाठी खास डबलडेकर हेरिटेज टूर बससेवा चालविण्यात येणार आहे. या बस रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत धावणार आहेत. या बसची सुरुवात म्युझियम येथून होऊन गेट वे आफ ईंडिया, नरिमन पाईण्ट, मरिन ड्राईव्ह, चर्चगेट, महर्षि कर्वे रोड, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, मुबई सेट्रल, भायखळा, जिजामाता उद्यान, लालबाग आणि परत भायखळा, मुंबई सेंट्रल, ताडदेव, चर्नीरोड, मरिन लाईन्स, मेट्रो सिनेमा, सीएसएमटी येथून म्युझियम पर्यंत हॉप ऑन हॉप ऑफपद्धतीने धावणार आहे. या बसचे वरच्या मजल्यासाठी 150 तर, खाली बसण्यासाठी 75 रुपये तिकिट आकारण्यात येणार आहे.

या मार्गावर धावणार जादा बस

बस नंबर 1 मर्या. ईलेक्ट्रिक हाऊस ते कुलाबा आगार-बीकेसी, बस नं. 4 मर्या. आोशिवरा आगार ते जे. जे. रुग्णालय, बस नं. 7 मर्या. विक्रोळ आगार ते जे. जे. रुग्णालय, बस नं. 8 मर्या. शिवाजी नगर ते जे.जे. रुग्णालय, बस नं. 66 मर्या. राणी लक्ष्मीबाई चौक-कुलाबा आगार, 202 मर्या माहिम बसस्थानक- बोरिवली स्थानक(पश्चिम), सी 302 राणी लक्ष्मीबाई चौक-महाराणा प्रताप चौक (मुलुंड), सी 305 बकबे आगार-धारावी आगार, सी 440 माहिम बसस्थानक -बोरीवली स्थानक

Back to top button