मुंबई तापाने फणफणली! डेंगीचे १०५ रुग्ण | पुढारी

मुंबई तापाने फणफणली! डेंगीचे १०५ रुग्ण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 1 ते 21 ऑगस्ट या 21 दिवसांच्या कालावधीत हिवतापाचे (मलेरिया) 509 तर, डेंगीचे 105 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन अ‍ॅलर्ट झाले असतानाच आता डेंगी, हिवतापासारख्या आजारांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर डोके वर काढले आहे. हिवताप या आजाराचा प्रसार ‘एनोफिलीस’ डासांमुळे, तर डेंगीचा प्रसार ‘एडिस’डासांमुळे होतो. घरातील बाटलीची झाकणे, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकूलीत यंत्रणा, शीतकपाटाचा
डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तुंमध्ये साचलेल्या काही थेंब पाण्यातही उत्पन्न होणारे डास
हे डेंगी, हिवताप यासारख्या घातक रोगांच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे साचलेले पाणी नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी
माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार दिली आहे.

सार्वजनिक ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आल्यास नष्ट करण्यासाठी आरोग्य खात्याद्वारे व कीटक नियंत्रण खात्याद्वारे कार्यवाही
करण्यात येते, अशी माहिती पालिकेचे कीटकनाशक खात्याचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली

‘कोरडा दिवस’ पाळावा

घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम ठेवलेले असतात. यातील पाण्यात डेंगी आजार पसरविणार्‍या डासांच्या अळ्या वेळोवेळी मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. याकरिता हे पिंप व इतर पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडी ठेवून आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Back to top button