मुंबई : मंत्रालयाच्या छतावरून आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

मुंबई : मंत्रालयाच्या छतावरून आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  2014 साली मराठा आरक्षणातून आरोग्यसेविका म्हणून निवड होऊनही अद्याप नोकरी न मिळाल्याने उस्मानाबाद येथील महिला उमेदवाराच्या पतीने मंत्रालयाच्या छतावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रसंग टळला. धनंजय चव्हाण असे या व्यक्‍तीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

2014 साली ईएसबीसी आरक्षण लागू असताना कल्पना जाधव (माहेरचे नाव) या तरुणीची आरोग्य सेविका म्हणून निवड झाली होती. मात्र नियुक्‍ती पत्र मिळाले नाही. अनेक वर्षे प्रयत्न करूनही आपल्या पत्नीला नोकरी मिळत नसल्याने हताश झालेला तिचा पती धनंजय चव्हाण याने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयाचा सातव्या मजल्याचे छत गाठले. त्याने छतावर चढून घोषणा देत खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या सोबत असलेला ज्ञानेश्वर भगत याने त्याला प्रसंगावधान राखून धरले. तरीही तो उडी मारण्याचा प्रयत्न करत होता.

छतावर चाललेल्या या गोंधळाने मंत्रालयातील पोलिस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी लगेच मंत्रालयाच्या गच्चीत धाव घेतली. मंत्रालयात असलेली अग्निशमन यंत्रणाही सावध झाली. मात्र कोणी जवळ आले तर उडी मारू, असा पवित्रा या तरुणाने घेतला. या गोंधळामुळे मंत्रालयात बघण्याची गर्दी जमली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Back to top button