अमरावतीत अज्ञात रोगामुळे हजाराहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू, राज्यसरकारने तातडीने पाऊले उचलावीत : अजित पवार | पुढारी

अमरावतीत अज्ञात रोगामुळे हजाराहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू, राज्यसरकारने तातडीने पाऊले उचलावीत : अजित पवार

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : अमरावती जिल्ह्यातील काळाखडक व जनुना येथील मेंढपाळांच्या एक हजाराहून अधिक मेंढ्यांचा अज्ञात रोगामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र मेंढ्यांचे मृत्यू नेमक्या कोणत्या रोगामुळे होत आहेत, याबाबत अजूनही तेथील पशुसंवर्धन विभागाने जाहीर केलेले नाही. या रोगाचा इतर मेंढ्यांमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तेथे कोणतीही खबरदारीची उपाययोजना राबविण्यात आलेली नाही, याकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत विधानसभेच्या सभागृहाचे लक्ष वेधले.

दरम्यान, मेंढ्यांमध्ये उद्भवणाऱ्या या संसर्गजन्य आजारावर तातडीने उपाययोजना करुन मेंढपाळांना दिलासा देण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. अमरावती जिल्ह्यातील काळाखडक आणि जनुना येथे गेल्या काही दिवसापासून अज्ञात रोगामुळे मेंढपाळांच्या एक हजाराहून अधिक मेंढ्या मृत्यूमुखी पडल्‍या आहेत. मेंढ्यांच्या तोंडाला फोड येणे, अंगात ताप येणे, पायाला जखम होणे अशी लक्षणे दिसत आहेत. अशा प्रकारची लक्षणे ब्लू टंग, पायरेकझिया, तांडखुरी-पायखुरी किंवा प्लुरो न्यूमोनिया या चार आजारात दिसतात. मात्र अजूनही पशुसंवंर्धन विभागाकडून या ठिकाणी मृत होत असलेल्या मेंढ्या नेमक्या कोणत्या रोगाची शिकार आहेत. हे जाहीर केलेले नाही. त्यामुळे आजारी मेंढ्यांवर अंदाजे उपचार करण्यात येत आहेत.

ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. या रोगाचा प्रसार अत्यंत वेगाने होत असून रोगाची लक्षणे दिसल्यानंतर अवघ्या तीन दिवसात मेंढ्यांचा मृत्यू होत आहे. हा रोग इतर मेंढ्यांच्यात फैलावू नये म्हणून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणाची कोणतीही मोहीम राबवण्यात आलेली नाही, असेही अजित पवार म्हणाले.

अमरावती जिल्ह्यातल्या काळा खडक आणि जनुना येथे मेंढपाळांची मोठी संख्या आहे. या मेंढपाळांच्याकडे एकूण तीस हजारांच्यावर मेंढ्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मेंढ्या असतानाही या परिसरात कायमस्वरुपाचा पशुवैद्यकीय दवाखान्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील मेंढपाळांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागत आहे. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेऊन तातडीने पाऊले उचलण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

हेही वाचा  

Back to top button