

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रियाध-मुंबई विमान प्रवासा दरम्यान विमानाच्या टॉयलेटमध्ये 'दम मारो दम' करणे एका प्रवाशाला महागात पडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच मोहम्मद परवेज शेख या प्रवाशाला सहार पोलिसांनी अटक केली. तो मिरा-भाईंदरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध एअरक्राफ्ट कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मोहम्मद परवेज हा काही दिवसांपूर्वी आखाती देशात गेला होता. शनिवारी तो रियाधहून मुंबईकडे जाणार्या विमानातून प्रवास करीत होता. प्रवासादरम्यान त्याला सिगारेटची तलफ लागली. तो विमानाच्या टॉयलेटमध्ये गेला आणि त्याने तिथे दम मारो दम करु लागला. हा प्रकार विमानातील कर्मचार्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला सक्त ताकिद दिली होती. स्मोकिंग करुन मोहम्मद परवेजने इतर प्रवाशांच्या जिवास धोका निर्माण होईल असे कृत्य केले होते. ही माहिती नंतर मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकार्यांना देण्यात आली होती.
त्यामुळे विमानतळावर उतरताच त्याला सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याविरुद्ध एअरक्राफ्ट कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.