मुंबई : एटीएमची अदलाबदल करून फसवणूक करणार्‍या आरोपीस अटक  | पुढारी

मुंबई : एटीएमची अदलाबदल करून फसवणूक करणार्‍या आरोपीस अटक 

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एटीएमची अदलाबदल करून फसवणूक करणार्‍या एका रेकॉर्डवरील आरोपीस पवई पोलिसांनी अटक केली.
तुफेल अहमद लालमियाँ सिद्दीकी असे या 36 वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी विविध बँकेचे 130 हून अधिक एटीएम कार्ड आणि गुन्ह्यांतील बाईक जप्त केली आहे. त्याच्या अटकेने सात गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

रोशनकुमार सिंग हा तरुण 30 जुलैला पवईतील साकीविहार रोडवरील एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील एटीएम कार्डची अदलाबदल केली होती. त्यानंतर त्याच्या कार्डवरून 59 हजार रुपये काढण्यात आले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्याने पवई पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच एपीआय विनोद पाटील, पोलीस अंमलदार टिळेकर, झेंडे, जाधव, सुरवाडे, राठोड यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून साकीनाका येथील जोशनगर परिसरातून अटक केली.
चौकशीत त्याची पोलिसांनी चौकशी केली असता त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी विविध बँकेचे 130 एटीएम कार्ड, बाईक जप्त केली.

तुफेल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घाटकोपर, माहीम, व्ही. बी. नगर, साकीनाका आणि पवई पोलीस ठाण्यात आठहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने गोरेगाव आणि सांताक्रूझ परिसरात अशा प्रकारे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले.

Back to top button