मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पोलिसांची कमतरता | पुढारी

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पोलिसांची कमतरता

मुंबई; जयंत होवाळ :  मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र अपुर्‍या मनुष्यबळाअभावी त्यांच्यावरही कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे संपूर्ण महामार्गावर सातत्याने गस्त घालणे जिकीरीचे होत आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2016 साली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अपुर्‍या मनुष्यबळावर चर्चा झाली. होमगार्ड, निवृत्त झालेले लष्करी जवान आदिना महामार्ग पोलिसांच्या दिमतीला देण्यात येईल, 365 दिवस मनुष्यबळ उपलब्ध असेल अशी ग्वाही या बैठकीत देण्यात आली होती. मात्र मनुष्यबळ मिळाले नाही.

महामार्गावर गस्त घालणे, अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होणे, अपघातग्रस्तांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करणे आदी कामे महामार्ग पोलिसांना करावी लागतात. महामार्गात कधी कधी एखादे अवजड वाहन अचानक बंद पडते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ती दूर करण्यासाठीही त्यांना पुढाकार घ्यावा लागतो. एखादे अवजड वाहन कलंडले, रसायन वाहून नेणारा टँकर उलटला तर, काम आणखी जिकीरीचे होऊन बसते.

टँकर हटवणे, सांडलेले रसायन दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणेला मदत करणे यासाठीही त्यांना पुढाकार घ्यावा लागतो. या कामात अनेक तास खर्ची पडतात. काही वेळेस ड्युटीचे तासही संपून जातात. मात्र घटनास्थळावरून जाता येत नाही. ग्रामीण पट्ट्यात महामार्गावर घुसखोरी करणार्‍या दुचाकीस्वारांना अटकाव करणे ही पोलिसांसाठी डोकेदुखी झाली आहे. ग्रामीण भागातील तरुण दादागिरी करतात,
उलट्या बाजूने वाहने नेतात, त्यांना रोखण्याचे काम करावे लागते. घुसखोरी करणार्‍या दुचाकीस्वारांना अडवताना अनेकदा जीवावर बेतते. अडवणार्‍या पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालण्याच्या घटनाही घडल्या आहेत. महामार्ग पोलिसांना आडोसा मिळावा म्हणून टोलनाक्याच्या जवळ मंडप टाकण्यात आले आहेत. पावसाळ्यात या मंडपात बसून काम करणे त्रासदायक होते. किमान कंटेनर स्वरूपातील व्यवस्था व्हावी अशी त्यांची भावना आहे. पोलिसांना त्यांच्या वाहनांच्या डीझेलचाही प्रश्न भेडसावतो. पुणे ग्रामीण विभागाकडून डिझेल पुरवठा नियमित होत नाही, असेही बोलले जाते.

अपघातांच्या कारणांचे विश्लेषण नाही

महामार्गावर अपघात कोणत्या कारणाने होतात याचे शास्त्रशुद्ध विश्लेषण झाल्याचे दिसत नाही. अनेकडा अवजड वाहनांना दोष दिला जातो. मात्र अपघातास लहान वाहनचालही मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे दिसते. काही लहान वाहन चालकांना मुंबई किवा पुण्यात वाहन चालवण्याचा सराव असतो. मात्र महामार्गावर आल्यावर ते गांगरून जातात. गर्दीमुळे शहरात वेगाने वाहने चालवता येत नाहीत. असे वाहनचालक महामार्गावर येतात, तेव्हा त्यांना वेगाची नशा चढते. परंतु ऐनवेळी वेग कसा नियंत्रित करावा याचे कौशल्य त्यांच्याकडे नसते. अपघातग्रस्त व्यक्ती कोणत्या मनस्थितीत वाहन चालवत होती, कोणत्या ताणाखाली होती का, नैराश्य होते का, पुरेशी झोप झाली होती का, वेग मर्यादेचे उल्लंघन झाले असेल तर ते का झाले, या शास्त्रशुद्ध विश्लेषणाचा अभाव आपल्याकडे आहे. याकडे
महामार्ग सुरक्षा अभ्यासक तन्मय पेंडसे यांनी लक्ष वेधले.

Back to top button