मुंबई: सरकारी नोकरीसाठी 43 खेळांमध्ये स्पर्धा; 5 टक्के आरक्षणाच्या मैदानात आता गोविंदाही | पुढारी

मुंबई: सरकारी नोकरीसाठी 43 खेळांमध्ये स्पर्धा; 5 टक्के आरक्षणाच्या मैदानात आता गोविंदाही

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी आजवर 43 खेळांमध्ये स्पर्धा होती. दहीहंडीचा साहसी खेळामध्ये समावेश झाल्याने आता गोविंदांचीही भर पडली आहे. स्पोर्ट्स कोट्यामध्ये खेळाडूंच्या गुणवत्तेच्या आधारावर नोकरी दिली जाते.

स्पोर्ट्स कोट्याद्वारे भरतीसाठी किमान पात्रता निकष दहावी आणि इंटरमिजिएट परीक्षा असे आहेत. क्रीडा कोट्यातील नोकर्‍यांसाठी सर्व विभागांचे वेगवेगळे निवड निकष आहेत, जे खेळाडूंना पूर्ण करणे अनिवार्य आहे. याशिवाय, क्रीडा कोट्यातील नोकरीसाठी वेगवेगळ्या ग्रेड पेनुसार विविध गुणवत्तेच्या निकषांचीही तरतूद आहे. या आदेशांनुसार खालील निकषांच्या संदर्भात गुणवान खेळाडूंच्या नियुक्त्या केल्या जातात.

हे खेळाडू पात्र

आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळांनी आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले विद्यार्थी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित शाळांसाठी राष्ट्रीय खेळ/खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले खेळाडू हे स्पोर्ट्स कोटा मिळवण्यासाठी पात्र असतात.

राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या आणि सर्वोत्तम गुणवत्ताधारक अपंग खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन पॅरा गेम्स स्पर्धा, कॉमनवेल्थ पॅरा गेम्स स्पर्धा, आशियाई पॅरा चॅम्पियन्सशिप स्पर्धा, ज्युनियर वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धा आदी विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या किंवा छाप पाडणार्‍या खेळाडूंची दखल घेतली जाते.

हे आहेत खेळ

धनुर्विद्या (आर्चरी), अ‍ॅथलेटिक्स (ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटसह), आट्या-पाट्या, बॅडमिंटन, बॉल-बॅडमिंटन, बास्केटबॉल, बिलियर्ड्स आणि स्नूकर, बॉक्सिंग, ब्रिज, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलिंग घोडेस्वारी, फुटबॉल, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, (शरीरसौष्ठव), हँडबॉल, हॉकी, आइस-स्कीईंग, आइस हॉकी, आइस-स्केटिंग, ज्युडो, कबड्डी, कराटे-डो, कयाकिंग आणि कॅनोइंग, खो-खो, पोलो, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी(शूटिंग), रोलर स्केटिंग, रोईंग, सॉफ्ट बॉल, स्क्वॉश, जलतरण, टेबल, टेनिस, तायक्वांदो, टेनिस-कोइट, टेनिस, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, यॉटिंग.

आंतरराष्ट्रीय विजेत्यांना थेट नोकरी

दक्षिण आशिया फेडरेशन गेम्स (सॅफ), आशियाई स्पर्धा (एशियाड), फेडरेशन कप, विश्वचषक, ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल आदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विशिष्ट क्रीडा स्पर्धांमध्ये पदके मिळवणार्‍या राज्यातील खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती केली जाते.

54 खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित

दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा क्षेत्रात उमटली आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्या महाराष्ट्रातील 54 खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रश्न तीन वर्षांपासून मार्गी लागलेला नाही. याचे सरकारला सोयरसुतक नसल्याने काही खेळाडूंनी म्हटले आहे.

ऑगस्ट 2015मध्ये तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यानंतर त्याची पुढे कार्यवाही झाली नाही. आता शिंदे सरकारने एक पाऊल पुढे टाकताना साहसी खेळाच्या दर्जासह प्रत्येक वर्षी प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो-लीग भरवण्याची घोषणा केली आहे. मात्र, एका गोविंदा पथकामध्ये किमान 50 गोविंदा असतील, तर किती जणांना सरकारी नोकरी देणार? निकष काय, असे प्रश्न विचारले जात आहेत.

Back to top button