मुंबईत दहीहंडीचा थरार सुरु…; गोविंदा आला रे आला… | पुढारी

मुंबईत दहीहंडीचा थरार सुरु...; गोविंदा आला रे आला...

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गोविंदा आला रे आला.. मच गया शोर सारी नगरी मे… या गाण्यांच्या ठेक्यावर मुंबई शहर व उपनगरात दहीहंडीचा थरार सुरू झाला आहे. पाच, सहा, सात, आठ थराची सलामी देऊन, गोविंदा पथक प्रत्येक दहीहंडी उत्सवाला भेटी देत आहेत. त्यामुळे उत्सव ठिकाणी गोविंदा पथकासह मुंबईकरांची गर्दी वाढू लागली असून प्रत्येकामध्ये उत्साह दिसून येत आहे. यावेळी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे उत्सवाच्या ठिकाणी राजकीय पक्षांची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी दिसून येत आहे.

कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत दहीहंडीचा जल्लोषात उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे अक्षरशः मुंबईकरांमध्ये संचार भरला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून वरळीच्या जांबोरी मैदानासह मुंबई शहर व उपनगरातील दहीहंडी उत्सवाजवळ मुंबईकरांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. शहरात भाजपच्या ३७० दहीहंड्यांसह अन्य राजकीय पक्षांच्या सुमारे दीडशेहून जास्त हंड्या आहेत. यंदा दहीहंडी उत्सवात भाजपाचा बोलबाला दिसून येत आहे.

सकाळी आठ वाजल्यापासूनच गोविंदा पथकांचे ट्रक, बस भेंडे फोडण्यासाठी बाहेर निघाले आहेत. अनेक मोठ्या बदकांबरोबर डॉक्टरची टीमही असून उत्सव स्थळी रुग्णवाहिका व अग्निशमन दल तैनात ठेवण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. नाक्या नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून गोविंदा पथकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. जय जवान गोविंदा पथकाने पहिली सलामी भांडुप येथील मनसेच्या दहीहंडी उत्सवात दिली. या ठिकाणी जय जवान गोविंदा पथक ९ थरांची कडक सलामी दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button