दहीहंडी उत्सव: शिंदे-फडणवीस सरकारकडून जखमी गोविंदांवर निशुल्क उपचार करण्याचा निर्णय | पुढारी

दहीहंडी उत्सव: शिंदे-फडणवीस सरकारकडून जखमी गोविंदांवर निशुल्क उपचार करण्याचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोपालकाला खेळताना जखमी झालेल्या गोविंदांवर (दहीहंडी) शासकीय रूग्णालयात मोफत उपचार देण्यात यावेत अशी सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. हे उपचार सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. यानुसार महापालिका व नगरपालिकांच्या रुग्णालयांमध्ये निशुल्क उपचार करण्याबाबतचा शासन निर्णय नगरविकास विभागाने काढला आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाने जखमी गोविंदांना (दहीहंडी)  मोफत उपचार देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. विरोधी पक्षाच्या या मागणीला ग्रीन सिग्नल देत, मुख्यमंत्र्यांनी गोविंदांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्याच्या सूचना देण्यात येतील असे सांगितले होते. यानंतर आज मुख्यमंत्री कार्यालयाकडून दहीहंडी कार्यक्रमादरम्यान गोविंदास दुखापत झाल्यास त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा केली आहे.

‘गोविंदां’ना सरकारी नोकर्‍यांत पाच टक्के आरक्षण : मुख्यमंत्री

दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. पुढील वर्षी प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो-दहीहंडीचा थरार राज्यात रंगणार असल्याचेही त्यांनी घोषित केले. तसेच शासकीय सेवेतील पाच टक्के आरक्षणात गोविंदांचा (दहीहंडी) समावेश करण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले.

Back to top button