‘गोविंदां’ना सरकारी नोकर्‍यांत पाच टक्के आरक्षण : मुख्यमंत्री | पुढारी

‘गोविंदां’ना सरकारी नोकर्‍यांत पाच टक्के आरक्षण : मुख्यमंत्री

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. पुढील वर्षी प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो-दहीहंडीचा थरार राज्यात रंगणार असल्याचेही त्यांनी घोषित केले. तसेच शासकीय सेवेतील पाच टक्के आरक्षणात गोविंदांचा समावेश करण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले.

दरम्यान, दहीहंडीत मनोरे रचताना पडल्यामुळे एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना यावर्षी मुख्यमंत्री निधीतून दहा लाखांची मदत दिली जाणार आहे. जखमींनाही सात लाखांपर्यंतची मदत मिळणार आहे. पुढील वर्षापासून त्यांना विमा कवच मिळेल. शुक्रवारी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केल्याने गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. विशेषतः दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा उत्सव यंदा दणक्यात साजरा होणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे गोविंदांची घागर रिकामी होती. आता राज्य सरकारने दहीहंडीवरील निर्बंध शिथिल केल्याने मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही वर्षापासून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची मागणी होत होती. एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन गोविंदा पथकांचा आनंद आणखी द्विगुणित केला.
दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

गोविंदांचा दहीहंडीच्या थरावरून पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल. एका दिवसात गोविंदा पथकांसाठी विमा योजना राबविणे शक्य नसल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहीहंडीच्या थरावरून प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरून पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. हा आदेश केवळ या वर्षासाठी लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणार्‍या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रीमियम भरण्याची योजना शासन तपासत आहे.

औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात यावा आणि गोविंदांना खेळाडूच्या सुविधा मिळाव्यात, अशी मागणी केली. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य केली. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनीही ही मागणी केली होती.

Back to top button