विधानभवनातून : मंत्र्यांची भंबेरी, शेलारांची हरकत! | पुढारी

विधानभवनातून : मंत्र्यांची भंबेरी, शेलारांची हरकत!

मंत्री व्हायची हौस प्रत्येकाला असते. पण अधिवेशनाच्या काळात विधानसभागृहात विरोधकांच्या हल्ल्याला तोंड देण्याची वेळ आली की भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यात समोर अजित पवारांसारखा तोफखाना असेल तर तयारी न करता सामोरे जाणार्‍यांची काय अवस्था होते याचा नमुना गुरुवारी प्रश्‍नोत्तराच्या तासात पहिल्याच प्रश्‍नाला दिसला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (तेच ते… पुण्यातल्या कालव्याला खेकड्यांनी पोखरल्याने गळती लागल्याचा शोध लावणारे!) यांची पहिल्याच दिवशी दमछाक झाली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलेल्या प्रश्‍नांच्या भडीमाराला तोंड देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांना अक्षरशः नाकीनऊ आले. अखेर समाधानकारक उत्तर देता न आल्याने प्रश्‍न राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली.

अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचार्‍यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्‍त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्‍नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांना विचारली होती. ही माहिती आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही आणि पहिलाच प्रश्‍न राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली.

अधिवेशनाच्या काळात सभागृहात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक नोकझोक होते. टोमणेबाजी होते. अनेकदा फिरकीदेखील घेतली जाते. सभागृहात तापलेले वातावरण एखाद्या सदस्याच्या गमतीदार शब्दप्रयोगामुळे शांत होऊन हास्यकल्लोळ होतो. पूर्वी दोन्ही बाजूला अभ्यासू आणि उत्तम वक्‍ते असलेले नेते असल्याने अनेकदा असे गमतीदार प्रसंग घडत असत. एकमेकांवर प्रहार करताना काही प्रश्‍नांवर आक्रमकपणे तर काही प्रश्‍नांवर हसत खेळत टोलेबाजी करत सरकारकडून हवी ती उत्तरे काढून घेण्याचा प्रयत्न होत असे. अलीकडे भाषेवर प्रभुत्व असलेल्या चांगल्या वक्त्यांची वानवाच असल्याने क्‍वचितच असा अनुभव येतो. अशीच जुगलबंदी रंगली ती छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात! तीही दाढीवरून!! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काळी दाढी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पांढरीशुभ्र दाढी प्रसिद्ध आहे. छगन भुजबळ यांनी शाळेतील पुस्तकांवरील जीएसटीवर बोलताना सरकारला टोले हाणले. नशीब, तुम्ही भाषणावर जीएसटी लावली नाही. आता फडणवीस यांची दिल्लीतील ताकद वाढली आहे. पक्षाच्या केंद्रीय समितीवर त्यांची नियुक्‍ती झाली आहे. जरा तिथे जाऊन सांगा, अन्‍नधान्यावर तरी जीएसटी लावू नका, असे आवाहन भुजबळ यांनी केले. नंतर भुजबळांचा मोर्चा वळला तो मुख्यमंत्र्यांच्या दाढीकडे.

शिंदे हे महाराष्ट्राचे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री आहेत. पण यांची काळी दाढी असल्याने त्यांचा प्रभाव हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. पांढर्‍या दाढीचा प्रभाव हा पूर्ण हिंदुस्थानावर आहे, असा टोला भुजबळांनी लगावला. यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटीसंदर्भात केंद्रात झालेल्या बदलानुसार हे बिल आणल्याचा खुलासा केला. भुजबळसाहेबांनी लोकसभेत करावयाचे भाषण विधानसभेत केले. आमच्याकडे पांढर्‍या दाढीचा फार सन्मान केला जातो, असे उत्तर फडणवीस यांनी दिले.
आशिष शेलारांची हरकत!

सभागृहात प्रत्येक आमदाराला बोलण्यासाठी एक माईक लावलेला असतो. केवळ मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्या टेबलवर दोन माईक लावले आहेत. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी हरकतीचा मुद्दा मांडत अध्यक्षांनाच सवाल केला. विधानसभेचे अध्यक्ष सगळ्या सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण करतात. सभागृहातील सर्व सदस्यांना समान अधिकार, समान विशेषाधिकार आहेत. परंतु सभागृहातील केवळ तीनच सदस्यांना दोन माईक दिले आहेत, अशी कोपरखळी शेलारांनी मारली.

विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच दोन माईक आहेत. सभागृहातील सर्व सदस्यांचा आवाज एका माईकवर महाराष्ट्रभर पोहोचतो. बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे एकाच माईकवर काम करू शकतात. मग या तीनच सदस्यांना दोन माईक देण्याचे कारण काय? असा सवाल शेलारांनी केला. या सदस्यांवर कुणी पाळत ठेवतंय का? या सदस्यांबाबतीत विशेष माहिती कुणाला हवीय का? अशी सरबत्ती त्यांनी केली. हे दोन माईक का आहेत, त्यावर शेलारांना एकादेखील माईकची गरज नाही. ते माईकशिवायही तेवढेच इफेक्टिव्ह आहेत. तरीही त्यांनी घेतलेल्या हरकतीची सखोल चौकशी करून हा आवाज कुठे जातोय का याबाबत माहिती घेऊ, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमच्या एक माईकचा आवाज दिल्लीला जातो. म्हणजे आमच्या सगळ्यांचा आवाज दिल्लीला जातोय. आमचंही ऑफिस दिल्लीलाच आहे, असे सांगितले तेव्हा सभागृहात हशा पिकला. – उदय तानपाठक

Back to top button