दहीहंडी ‘खेळ’ म्हणून घोषित, गोविंदांना मिळणार सरकारी नोकरीचा लाभ! | पुढारी

दहीहंडी ‘खेळ’ म्हणून घोषित, गोविंदांना मिळणार सरकारी नोकरीचा लाभ!

पुढारी ऑनलाईन डेस्क : दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. त्याबरोबर इतर खेळाप्रमाणे राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित केली जाईल. दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू किंवा ते जखमी झाल्यास अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आल्याचीही त्यांनी यावेळी माहिती दिली. दहीहंडी दिवशी सर्वजनिक सुट्टी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज (दि. 18) अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची मोठी घोषणा केली. तसेच दहीहंडीतील गोविंदांना राज्य सरकारकडून देण्यात येणा-या पाच टक्के आरक्षणाचा लाभ नोकऱ्यांमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येईल. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत तर, गंभीर जखमी झालेल्यांना साडेसात लाख रुपये आणि हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Back to top button