

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांवरून आज विधिमंडळात सरकारवर प्रश्नांच्या भडीमार केला. आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांना पवारांच्या प्रश्नांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे शिंदे सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की आली. प्रश्नाचे उत्तर सरकारकडून सोमवारी दिले जाणार आहे.
पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर असून ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातल्या ८० बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील २९ बालकांना या रोगाची लागण झाली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डासांमुळे पसरणारा हत्तीरोग गंभीर असून त्यामुळे शरीर विद्रुप व अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत, याकडे लक्ष वेधले.
हत्तीरोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना विचारली. ही माहिती आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे हा प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.