

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहर व उपनगरात विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी (दि. १६) रोजी सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू केली. शहर उपनगरापेक्षा पश्चिम उपनगरात पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली असून मध्य व पश्चिम रेल्वेची उपनगरीय गाड्याही १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत.
मुंबईत दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी, सकाळी पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोपून काढले. पहाटे संपूर्ण शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत पश्चिम उपग्रहात ठिक-ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी बरसल्या. कांदिवलीला तब्बल ८३ मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मालाड येथेही ७८ मिमी पाऊस झाला. शहर विभागात हाजीअली वरळी परिसरात सर्वाधिक ७० मिमी पाऊस झाला.
पावसासोबत वाराही सुटल्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडली आहेत. काही ठिकाणी शॉर्टसर्किटच्या किरकोळ घटना घडल्या. तर पश्चिम उपनगरात घर व संरक्षण भिंतीचीही किरकोळ पडझड झाली आहे. दरम्यान सकाळी पश्चिम द्रुतगती महामार्गासह एस. व्ही. रोड, लिंक रोड, एलबीएस मार्ग, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, चेंबूर, सायन, भायखळा, फोर्ट आदी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी वसई- विरार आदी भागातून येणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वेची लोकल सेवाही विस्कळीत झाली होती.
सरासरी पाऊस सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत
शहर : ४४.२० मिमी ( हाजीअली – ६१ मिमी, दादर – ५९मिमी, भायखळा – ५६ मिमी, ग्रँटरोड – ५५ मिमी, मलबार हिल – ५३ मिमी, वडाळा – ४८ मिमी)
पूर्व उपनगर : ३६.५५ मिमी (भांडुप कॉम्प्लेक्स – ४६ मिमी, विक्रोळी अग्निशमन – ४० मिमी, विक्रोळी (प.) – ३९ मिमी, मुलुंड – ३५ मिमी)
पश्चिम उपनगर : ४९.१२ मिमी (कांदिवली – ८३ मिमी , चिंचोली – ७८ मिमी, दहिसर ७६ मिमी, बोरिवली – ७५ मिमी)
हेही वाचलंत का?