आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करुन भाजपा नेत्यांची बदनामी | पुढारी

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करुन भाजपा नेत्यांची बदनामी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करुन भाजपा नेत्यांची बदनामी झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अज्ञात हॅकर्सविरुद्ध भादवीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

दिनेश रघुनाथ दहिवलकर हे मालाड येथील कुरार व्हिलेज परिसरात राहतात. ते भाजपाचे आमदार राजहंस सिंह यांच्याकडे स्विय सहाय्यक म्हणून काम करतात. गेल्या बारा वर्षांपासून त्यांचे फेसबुक एक अकाऊंट असून त्यात त्यांचे दोन हजाराहून अधिक मित्र आहेत. भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याने या पदाचा कार्यभार स्विकारण्यासाठी 14 ऑगस्टला दादर येथील भाजपा कार्यालयात एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, माजी मंत्री प्रकाश मेहता, आमदार पराग अळवणी, राजहंस सिंह, संजय उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर अपलोड केली होती. या पोस्टनंतर रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीने प्रदेश केबिनेट मंत्री आणि मुंबई के मंदबुद्धी अध्यक्ष मंगलप्रभात लोढाने आज मुंबई अध्यक्ष का कार्यभार संभाला, अबकी बार खाने के लिए गोपाल शेट्टी, प्रकाश मेहत, पराग अळवणी, राजहंस सिंह, संजय उपाध्याय आदी मौजुद रहे अशा प्रकारची पोस्ट शेअर केली होती.

Back to top button