राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार, 18 ते 20 मंत्री घेणार शपथ; 11 वाजता शपथविधी | पुढारी

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार, 18 ते 20 मंत्री घेणार शपथ; 11 वाजता शपथविधी

मुंबई; प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या-जुन्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. सामाजिक समीकरण आणि प्रादेशिक समतोल साधण्यावर भर देण्यात येणार आहे. भाजपचे 10 ते 12 आणि शिंदे गटाचे सात ते आठ मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते.

पहिल्या टप्प्यातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत प्रामुख्याने विधानसभेतील सदस्यांनाच संधी दिली जाणार आहे. असे असले तरी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा मात्र मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात समावेश केला जाऊ शकतो. चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र मंत्रिपदाची प्रतीक्षा करावी लागेल, अशी चर्चा आहे. प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि शिंदे गटाला समर्थन देणारे अपक्ष आमदार यांनाही मंत्रिपदासाठी थांबावे लागू शकते. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांच्या नावाचा समावेश असल्याचे उघड झाल्याने सत्तार यांच्या मंत्रिमंडळ समावेशाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी शपथ घेतली. तेव्हापासून दोघेच राज्याचा कारभार हाकत होते. वारंवार तारखा सांगूनही विस्तार झाला नव्हता. दोघांकडून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले जात होते. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दोघांनी अनेकवेळा दिल्लीवार्‍या केल्या. तरीही भाजप पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळत नसल्याने विस्तार रखडला होता. याशिवाय राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराविषयी अनिश्चितता होती. या याचिकेवर निर्णय आल्यानंतरच विस्तार केला जाईल अशी एक चर्चा होती. त्यामुळे विरोधी पक्ष शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर टीका केली होती.

या पार्श्वभूमीवर आता 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये सकाळी 11 वाजता हा शपथविधी पार पडेल. जुन्या-नव्या चेहर्‍यांचा समावेश होणार भाजपने आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्र्यांच्या यादीविषयी बराच खल करून नावे निश्चित केली आहेत. त्यामध्ये जुन्या आणि नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. त्यानुसार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, सुरेश खाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते. याशिवाय रवींद्र चव्हाण, डॉ. संजय कुटे, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ, योगेश सागर, मंगलप्रभात लोढा यांचीही नावे चर्चेत आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे 20 मंत्र्यांचा समावेश केला जाणार असून उर्वरित 20 जागा या रिक्त ठेवल्या जाणार आहेत. या जागा दुसर्‍या टप्प्यात भरण्यात येणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 39 आमदारांनी समर्थन दिले आहे. त्यात आठ माजी मंत्र्यांचा समावेश आहे. त्यापैकी दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदिपान भुमरे यांचा समावेश निश्चित आहे. तर शंभूराज देसाई, संजय राठोड, तानाजी सावंत, भरत गोगावले यांचाही समावेश होणार असल्याची चर्चा आहे.

Back to top button