Uday Samant : ‘भ्याड’ त्याला म्हणतात ज्यांचं बोट पकडून मोठं होतो, त्यांच्यावरच उलटतो, निष्ठावंत शिवसैनिकाचं उदय सामंतांना पत्र | पुढारी

Uday Samant : ‘भ्याड’ त्याला म्हणतात ज्यांचं बोट पकडून मोठं होतो, त्यांच्यावरच उलटतो, निष्ठावंत शिवसैनिकाचं उदय सामंतांना पत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील माजी मंंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात आक्रमक शिवसैनिकांनी हल्ला केला होता. याप्रकरणी त्यांनी काही शिवसैनिंकावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर उदय सामंत यांना त्यांचे कार्यकर्ते डॅा. अमोल अशोक देवळेकर यांनी एक पत्र लिहिले आहे. हे पत्र व्हायरल झाले आहे.

काय लिहिलं आहे पत्रात…(Uday Samant)

मा. उदयजी सामंत, आपणांस निष्ठावंत शिवसैनिकांचा शिरसाष्टांग दंडवत. उदयजी आपल्यावर काल पुण्यात जो हल्ला झाला त्याबद्दल निषेध करावा तितका थोडाच आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी सुरज लोखंडे, नगरसेवक विशाल धनवडे, आदींवर गुन्हा दाखल झाला आहे. शहरप्रमुखांसह पाच जणांना अटक देखील झाली आहे. आपण ईडी आणि सीबीआय पेक्षाही ज्या वायूवेगानं स्वसंरक्षणासाठी ही कामगीरी केली आहे तिची नोंद एखाद्या रेकॅार्ड बुकमध्ये करावी लागेल. आपले नेते मा. एकनाथ शिंदे व मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर या महाराष्ट्रात एकुणच कशा प्रकारचा राज्यकारभार चालणार आहे याचीच एक झलक दाखवणारी ही घटना आहे.

ज्या हल्लेखोरांना आपण भ्याड हल्लेखोर संबोधले, ज्यांनी आपल्याविरुद्ध कट केला आहे, जे आपल्या जीवावर उठलेत ही लोकं नेमकी आहेत तरी कोण? यांचा मास्टरमाईंड कोण? याचा शोध केंद्रीय तपासयंत्रणा घेतीलच तत्पुर्वी आगाऊची माहिती देण्याकरीता हा पत्रप्रपंच.

या प्रकरणात अटकेत असलेले पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे हे तेच शिवसैनिक आहेत जे आपली पुणे जिल्हा संपर्क प्रमुख निवड झाली तेव्हा रात्र रात्र जागून शहरभर बॅनर लावत होते. आपल्या प्रत्येक दौऱ्याच्या वेळी आपल्यासोबत आपली काळजी घेत होते. दुसरे आरोपी नगरसेवक विशाल धनवडे हे आपल्या वाढदिवसासाठी माझ्यासोबत रात्रभर प्रवास करून सकाळच्या पहिल्या ठोक्याला आपणांस शुभेच्छा देण्यासाठी थेट रत्नागिरीत पोहोचले होते. चंदन साळुंखे, गजानान थरकुडे, सुरज लोखंडे, अनिकेत घुले, रुपेश पवार, संभाजीराव थोरवे यांच्या हजारो बॅनर्सवर, भित्तीफलकांवर आपला चेहरा कालपर्यंत अभिमानानं विराजमान होता. मग तिच लोकं आज आपल्यावर हल्ला करत असतील तर त्यांच्यावर कारवाई ही व्हायलाच हवी. पण त्याआधी ‘भ्याड’ नेमकं कोण आहे? याचाही शोध घ्यायला हवा.

थोडं इतिहासात शिरुया…

यासाठी थोडं इतिहासात शिरुया. ज्या शरद पवारांच्या व राष्ट्रवादीच्या तावडीतून ‘सेना व हिंदूत्व’ वाचविण्यासाठी आपण तथाकथित बंड केले त्या राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे आपण महाराष्ट्र युवक अध्यक्ष होतात तेव्हापासून आम्हाला आपल्याविषयी आदर व अभिमान आहे. पुढं आपण आमदार झालात, या राज्याचे सर्वात तरुण नगरविकास राज्यमंत्री झालात याचंही आम्हाला प्रचंड कौतुक वाटलं. महाराष्ट्रातील ‘नर्सिंग होम ॲक्ट’चा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडं आलो तेव्हा तुम्ही विशेष दुरूस्ती करून सगळ्या वैद्यकीय व्यावसायिकांना दिलासा दिलात आणि आम्ही सर्वत्र तुमचं कौतुक करत फिरू लागलो. तुमचं तरुण वय, अजितदादांशी असलेली सलगी आमच्यासाठी कुतूहल आणि कौतुकाचा विषय होता. पुढं रत्नागिरीतलं तुमचं ‘हिंदूत्व’ धोक्यात आल्यामुळं तुम्ही राष्ट्रवादी सोडत शिवसेनेत प्रवेश केला आणि पवार साहेबांची साथ सोडत हाथी शिवबंधन बांधलं तेव्हाही आम्हाला काही वाईट वाटलं नाही.स्थानिक अडचणी असू शकतात. शेवटी हे राजकारण आहे. आम्ही तेव्हाही आपल्याला मानत होतो. पुढं आपण पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, नंतर या राज्याचे उच्चतंत्रशिक्षण मंत्री या पदांवर विराजमान झालात. आम्ही सारे आपल्यासाठी आनंदीच होतो परंतू एका रात्रीत आपण आम्हाला परके झालात, जी लोकं तुमची पालखी वहायचे ते तुमच्या जीवावर उठले कारण आम्ही बदललो नव्हतो तुम्ही बदलला होतात, बदलला आहात.

भ्याड त्याला म्हणतात जो आपल्याच जीवाभावाच्या माणसांवर गुन्हे दाखल करतो.

भ्याड त्याला म्हणतात जो दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या लोकांपासून दुरावतो.

भ्याड त्याला म्हणतात जो विचारसरणीच्या नावावर वैचारिक व्यभिचार करतो.

भ्याड त्याला म्हणतात ज्यांचे बोट पकडून मोठं होतो, त्यांच्यावरच उलटतो.

आणि भ्याड त्याला म्हणतात जो नीतिमुल्ये-नैतिकता-विचार व आपली माणसं या साऱ्यांशी प्रतारणा करतो.

उद्या उदय या नावात उदय होण्यासारखं काहीही शिल्लक रहाणार नाही!

आता आपण केंद्रीय सर्वशक्तिमान यंत्रणेच्या छत्रछायेत आहात, आपल्या विरुद्ध कट कारस्थान रचने किंवा हल्ला करणे हे पाकिस्तानलाही शक्य नाही तेव्हा ते धाडस संजय किंवा विशाल नक्कीच करणार नाही. परंतू तरीही आपण तसे गुन्हे दाखल करत असाल तर रात्री स्वस्थपणे स्वत:च्या डोक्यानं विचार करा अन् मग हव्या त्या यंत्रणेकडे, हव्या त्या न्यायालयात जा. उदयजी राजकारण येईल जाईल, पदंही संपतील पण त्यापायी तुमच्या अनेक पिढ्यांनी कमावलेली पत जर अस्तास गेली तर उद्या उदय या नावात उदय होण्यासारखं काहीही शिल्लक रहाणार नाही !

कळावे,

आपला विनम्र

डॅा.अमोल अशोक देवळेकर (पुणे)

Back to top button