गुलामगिरीकडे वाटचाल करणारी भाजपची निती : उद्धव ठाकरे | पुढारी

गुलामगिरीकडे वाटचाल करणारी भाजपची निती : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे राजकारण घृणास्पद असल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. गुलामगिरीकडे वाटचाल करणारी भाजपची निती आहे. त्यातच भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे प्रादेशिक पक्ष संपतील हे विधान हुकुमशाहीकडे नेणारे आहे. आजच्या राजकारणात केवळ बळाचा वापर केला जात आहे. पक्ष संपवायची हौस असेल तर जनतेत जाऊन संपवून दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

प्रादेशिक आस्मिता चिरडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. तुमच्याकडे आज बळ आहे, पण दिवस फिरतात अशा इशारा देत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपचा वंश कुठून सुरू झाला याचा विचार करणे गरजेचे आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम भाजप करत आहे. काळ नेहमी बदलत असतो, तो बदलला की आम्हीही सूडबुद्धीने वागू शकतो. संजय राऊत शरण जाऊ शकले असते पण त्यांनी तसं न करता ते संघर्ष करत आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना कधी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. देश कुठे चालला आहे, हे जनतेने आता उघड्या डोळ्यांनी बघावे असेही भावनिक आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.

संजय राऊतांबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. मी त्याच्या कुटुंबीयांना भेटलो. गुन्हा काय संजयचा? पत्रकार आहे, शिवसैनिक आहे, निर्भिड आहे. जे पटत नाही ते बोलतोय, मरण आलं तरी शरण जाणार नाही, हे त्याचं वाक्य सर्वांनी लक्षात ठेवावं असंच आहे. तोही शरण जाऊ शकला असता. जे शरण गेले ते हमाममध्ये आंघोळीला गेले. जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे. तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात. फेस गेल्यावर परिस्थितीची जाणीव होईल. त्यानतंर फेस उतरला तर ते काय आहेत हे लोकांसमोर येईल. काम संपल्यावर नवीन गुलाम येतील, हे गुलाम जातील, असा टोलाही ठाकरेंनी यावेळी भाजपला लगावला.

Back to top button