गोकुळ, वारणा म्हशीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ | पुढारी

गोकुळ, वारणा म्हशीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : मागील पाच महिन्यांपूर्वी म्हणजे मार्चमध्ये वारणा, गोकुळ दूधाच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ केली होती. आता पुन्हा दोन रुपयांनी वाढ करत एक लिटर दूधाचे दर 64 रूपयांवरून 66 रुपये केले आहेत. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.

जुलै महिन्यात नैसर्गिक रित्या म्हशीच्या दुध संकलनात दीड ते दोन लाख लिटर दूधाची वाढ दरवर्षी होते. मात्र यंदा जुलै संपल्यानंतर दूध संकलनात वाढ झाली नाही. यामुळे गोकुळने आपले बटर, तुप, श्रीखंड आणि दूध पावडर उत्पादन 100 टक्क्यांवरून 10 ते 15 टक्क्यांवर आणले. या उत्पादनासाठी लागणारे दूध विक्रीसाठी वळवले. अशी माहिती गोकुळचे मुंबई विभाग व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. उत्पादन कमी झाल्याने दिवाळीपर्यंत गोकुळचे दुध सुमारे 10 लाख लिटर विक्रीसाठी वाढवले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. गेल्या वर्षी 15 लाख लिटर दूधाचे संकलन होत होते. ते यावर्षी 14 लाखांवर आले. म्हणजे दुध संकलनात एक लाख लिटर दूधाचा पुरवठा कमी झाला. यामुळे ही दोन रुपये दरवाढ झाल्याचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी स्पष्ट केले.

अवघ्या पाच महिन्यातील ही दरवाढ ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केल्याने मार्चमध्ये गोकुळ व वारणा दूध 62 रुपये लिटर होते. त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करून 64 रुपये केले होते. मदर डेअरीने मार्चमध्ये गायीचे दूध 48 रुपये लिटर वरून 52 आणि अमोलने 49 रुपये लिटर वरून 51 रुपये केले होते. दूध संकलन कमी होत असल्याने मधल्या काळात दूधाचा तुटवडा भासू लागला होता. मुंबईत गोकुळचे साडे आठ लाख लिटर दुधाची विक्री होते. तर वारणाचे दोन लाख लिटर दूधाची विक्री होते. अमुलची सर्वाधिक 14 ते 16 लाख लिटर दूधाची विक्री होते. मात्र दुधाच्या दरात पाच महिन्यांत पहिल्यांदा गोकुळ आणि वारणाने दोन वेळा दोन-दोन रूपयांनी केलेल्या दरवाढीने ग्राहकांवर भुर्दड पडला आहे. एकीकडे 18 जुलैपासून जीवनावश्यक वस्तूंवर ( पॅकिंग ब्रॅड) वर 5 टक्के जीएसटी आकारला जात असतानाच ही दरवाढ सर्वसामान्यांना सोसावी लागणार आहे.

दूध संकलन :

2021 – एकूण संकलन 15 लाख लिटर
2022 – एकूण संकलन 14 लाख लिटर
दुध संकलन तुटवडा 1 लाख लिटर

  • मार्च 2022 मध्ये म्हशीचे दुध 64 रूपये लिटर
  • ऑगस्ट 2022 मध्ये 66 रुपये लिटर, अर्धा लिटर 33 रुपये
एकूण विक्री :
  • गोकुळ 8 लाख 50 हजार लिटर
  • वारणा 1 लाख 50 हजार लिटर
  • अमोल 15 लाख लिटर
  • महानंदा 1 ते सव्वा लाख लिटर

Back to top button